जिल्हा परिषदेचा २९ कोटी ७९ लाखांचा अर्थसंकल्प मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 09:51 PM2018-03-26T21:51:44+5:302018-03-26T21:51:44+5:30

जिल्हा परिषदेचे २९ कोटी ७९ लाख खर्चांचे आणि ९९ हजार रूपये शिलकीचे अंदाजपत्रक सोमवारी विशेष सभेत पारीत करण्यात आले. या सभेत सदस्यांनी काही योजनांसाठी निधी वाढवून देण्याची जोरदार मागणी केली.

Zilla Parishad's budget of 29 crore 79 lakhs approved | जिल्हा परिषदेचा २९ कोटी ७९ लाखांचा अर्थसंकल्प मंजूर

जिल्हा परिषदेचा २९ कोटी ७९ लाखांचा अर्थसंकल्प मंजूर

Next
ठळक मुद्दे९९ हजार शिल्लक : स्वउत्पन्नात १४ कोटींची वाढ

आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : जिल्हा परिषदेचे २९ कोटी ७९ लाख खर्चांचे आणि ९९ हजार रूपये शिलकीचे अंदाजपत्रक सोमवारी विशेष सभेत पारीत करण्यात आले. या सभेत सदस्यांनी काही योजनांसाठी निधी वाढवून देण्याची जोरदार मागणी केली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजीमंत्री दिवंगत पतंगराव कदम यांना श्रद्धांजली अर्पण करून विशेष सभेला सुरूवात झाली. जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी अनिल आडे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. अर्थ समिती सभापती निमीष मानकर यांनी विशेष सभेपुढे सन २०१७-१८ चे सुधारित, तर २०१८-१९ चे मूळ अंदाजपत्रक सादर केले. सुरूवातीची शिल्लक २२ कोटी ७२ लाख ६२ हजार ३३७ रूपये आणि अपेक्षित महसुली उत्पन्न सात कोटी ३९ लाख रूपये गृहित धरून सभापती मानकर यांनी २९ कोटी ७९ लाख १३ हजार रूपये खर्चाचे, परंतु ९९ हजार ३३७ रूपये शिलकीचे अंदाजपत्रक सादर केले. या अर्थसंकल्पात त्यांनी सात कोटी सात लाख ५० हजार रूपये महसुली उत्पन्न अपेक्षित धरले. या उत्पन्नात सुरूवातीची शिल्लक जोडून त्यांनी जमा रकमेतून कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी चार कोटी ७९ लाख ६६ हजार, १३ वने अंतर्गतच्या योजनांसाठी ८० लाख पाच हजार, तर समाजकल्याणच्या योजनांसाठी दोन कोटी १६ लाखांची तरतूद केली.
महिला व बालकल्याण विभागासाठी एक कोटी ३४ लाख, सामूहिक विकास योजनेसाठी एक कोटी ८३ लाख, पशुसंवर्धनसाठी ८९ लाख, कोल्हापुरी बंधाऱ्यावर बरगे टाकण्यासाठी ४० लाख, आरोग्य विभागासाठी ३५ लाख, शिक्षण विभागाकरिता ९५ लाख, बांधकाम क्रमांक एकसाठी तीन कोटी ४४ लाख, तर बांधकाम क्रमांक दोनसाठी पाच कोटी एक लाखांची तरतूद केली. या तरतुदीतून २०१८-१९ मध्ये विकास कामे केली जाणार आहे. मात्र अनेक सदस्यांनी अर्थसंकल्पात तरतूद करूनही गेल्यावर्षीचा निधी अखर्चित असल्याबाबत संताप व्यक्त केला.
सुरूवातीला स्वाती येंडे यांनी विशेष सभेत इतर विषय ठेवल्याबद्दल संताप व्यक्त केला. चितांगराव कदम यांनी अर्थसंकल्पाची प्रत ऐनवेळी मिळाल्याबद्दल रोष प्रगट केला. नंतर विज्ञान प्रदर्शनासाठी तीन लाखांची तरतूद असून शिक्षकांकडून सक्तीने वसुली केल्याचा आरोप केला. राम देवसरकर, स्वाती येंडे, गजानन बेजंकीवार यांनी तरतूद करूनही निधी अखर्चित राहात असल्याबद्दल प्रशासनाला धारेवर धरले. श्रीधर मोहोड यांनी जनावरांवर विविध रोग आक्रमण करीत असून अंदाजपत्रकात केवळ १५ लाखांची तोकडी तरतूद केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. महिला व बालकल्याण सभापती अरूणा खंडाळकर यांनी शिलाई मशीन, सायकल, अंगणवाडी दुरुस्तीसाठी निधी वाढवून देण्याची गरज पटवून दिली.
‘त्या’ विधेयकाला विरोध
विधानसभेत जिल्हा परिषद अधिनियम दुरुस्ती विधेयक सादर झाले. त्यावर शासनाने जिल्हा परिषदांचे मत मागविले. हा विषय सभागृहात उपस्थित होताच सर्वच सदस्यांनी या विधेयकाला एकमुखी विरोध केला. श्रीधर मोहोड, स्वाती येंडे, राम देवसरकर आदींनी हा सदस्यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. विधेयकात विशेष सभा बोलविण्यासाठी सध्याच्या १/५ ऐवजी २/५ सदस्यांची मागणी असणे आवश्यक करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच ही सभा अध्यक्षांनी ३० दिवसांऐवजी ६० दिवसांत पाचारण करावी, अशी दुरुस्ती आहे. यामुळे मूळ हेतूलाच हरताळ फासला जात असल्याचा आरोप सदस्यांनी करून या विषयाला एकमुखी विरोध केला.
सदस्यांना तीन लाखांचा निधी
जिल्हा परिषद सदस्यांना त्यांच्या मतदार संघातील विकास कामांसाठी आत्तापर्यंत दोन लाखांचा निधी दिला जात होता. अर्थ सभापतींनी या निधीत एक लाखांची वाढ करून हा निधी तीन लाख रूपये केल्याबद्दल सर्वच सदस्यांनी त्यांचे कौतुक केले. मात्र हा निधी आणखी वाढवून देण्याची मागणीही केली. तसेच राम देवसरकर यांच्या मागणीवरून सभेत जिल्ह्यातील शेतकºयांच्या शेतातील माती परीक्षणासाठी तत्काळ पाच लाखांची तरतूद करण्यात आली.

Web Title: Zilla Parishad's budget of 29 crore 79 lakhs approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.