जिल्हा परिषदेच्या चिमुकल्यांचा नाट्य महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 09:49 PM2019-03-18T21:49:21+5:302019-03-18T21:49:59+5:30
चकाचक शैक्षणिक संस्थांपासून कोसो दूर असलेल्या गोरगरिबांच्या मुलांसाठी जिल्हा परिषदेने आगळावेगळा नाट्य महोत्सव आयोजित केला आहे. विशेष म्हणजे, अशा पद्धतीचा महोत्सव घेणारी यवतमाळ ही राज्यातील एकमेव जिल्हा परिषद ठरली आहे. जिल्हास्तरीय बालनाट्य महोत्सव २५ मार्च रोजी होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : चकाचक शैक्षणिक संस्थांपासून कोसो दूर असलेल्या गोरगरिबांच्या मुलांसाठी जिल्हा परिषदेने आगळावेगळा नाट्य महोत्सव आयोजित केला आहे. विशेष म्हणजे, अशा पद्धतीचा महोत्सव घेणारी यवतमाळ ही राज्यातील एकमेव जिल्हा परिषद ठरली आहे. जिल्हास्तरीय बालनाट्य महोत्सव २५ मार्च रोजी होत आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने २०१७-१८ पासून या उपक्रमाला सुरुवात केली आहे. खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांमधील कला गुणांना मोठ्या व्यासपीठावर वाव मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील व्यावसायिक रंगभूमी गाजविणारे नाट्य कलावंत विद्यार्थ्यांकडून तालीम करवून घेत आहेत. स्पर्धेचे आयोजनही व्यावसायिक नाटकांच्या दर्जाचे करण्यात येत आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर यांनी दिली.
यंदा वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जवाहरलाल दर्डा श्रोतृगृहात ही जिल्हास्तरीय स्पर्धा सोमवारी होऊ घातली आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार प्रसिद्ध नाट्य कलावंत शाळाशाळांमध्ये जावून विद्यार्थ्यांकडून सराव करवून घेत आहे. सतीश पवार, शिल्पा बेगडे, लखन सोनुले, अमीत राऊत, मुन्ना गहरवाल, ठोंबरे, स्वप्नील किटे आदी नाट्य कलावंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहे.
सामाजिक विषयांना वाचा
जिल्हा परिषदेचे चिमुकले विद्यार्थी विविध सामाजिक विषयावरील नाटिका सादर करणार आहेत. यात बेटी हिंदुस्थान की (डोंगरगाव), आमचं पण नाटक (पांढुर्णा), दरबार पर्यावरणाचा (दहेगाव ता.घाटंजी), गावगाव ते गल्लीगल्ली (दहेगाव ता.वणी), आईचे उपकार (सोनवाढोणा), शेतकरी व्यथा (तळेगाव), वीर पत्नी (खडक सावंगा), वृद्धाश्रम (पोखरी) अशा विविध विषयांना नाटिकेतून उजेडात आणले जाणार आहे.