झेडपी शाळेत विद्यार्थ्यांची फरफट
By admin | Published: September 4, 2016 12:54 AM2016-09-04T00:54:00+5:302016-09-04T00:54:00+5:30
वेगवेगळे उपक्रम राबवून जिल्हा परिषदेच्या शाळांना भरभराटीचे दिवस आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
रिक्त पदे : अशैक्षणिक कामांचा विद्यार्थ्यांवर पडतोय ताण
अविनाश खंदारे उमरखेड
वेगवेगळे उपक्रम राबवून जिल्हा परिषदेच्या शाळांना भरभराटीचे दिवस आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र गुणवत्ता असूनही तालुक्यातील शाळांमध्ये अनेक पदे रिक्त असल्यामुळे गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात फरफट होत आहे.
ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांचे जीवन घडविणारे केंद्र म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा होय. या ठिकाणी शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज मोठ्या पदावर पोहोचले आहे. जुन्या पिढीतील अनेक शिस्तीच्या शिक्षकांनी मोठमोठे अधिकारी ग्रामीण भागातून राज्याला दिले आहेत. परंतु उमरखेड तालुक्यातील सध्याची परिस्थिती बघता काही मोजके शिक्षकच असा जाणीवपूर्वक प्रयत्न करताना दिसतात. इतर शिक्षक केवळ पगारापुरते हजेरीपटावर स्वाक्षरी मारून मोकळे होत आहे. इंग्रजी माध्यमाचे भूतही या शाळांच्या मानगुटीवर बसले आहे. प्रत्येक पालक आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमात शिकवण्यासाठी आटापिटा करीत आहे. गावागावांत कॉन्व्हेंट संस्कृती रुजू लागली आहे. टाय, बूट घातलेले विद्यार्थी आता खेड्यातही दिसू लागले आहे. ही बाब चांगली असली तरी या कॉन्व्हेंट संस्कृतीमुळे पालकांच्या खिशाला मात्र मोठा फटका बसत आहे. याच गोष्टी देण्याची क्षमता जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही आहे. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्या दृष्टीने प्रयत्न होताना दिसत नाही. त्यामुळेच तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांचा दर्जा घसरला आहे. शाळांचे मुख्य उद्दिष्ट वाचन आणि लेखन असताना शासनाला नियमित अध्यापनासोबत त्यासाठी विविध उपक्रम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.
शिक्षकांनाही शाळाबाह्य कामांचे ओझे पेलवत नाही. अनेक शिक्षक दैनंदिन अध्यापन कामाव्यतिरिक्त इतर कामांमध्येच व्यस्त दिसत आहेत. अपुरी शिक्षक संख्याही विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी मारक ठरत आहे. जिल्हा परिषद शाळांना पुन्हा एकदा चांगले दिवस येवू शकतात. मात्र त्यासाठी केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्यासोबत प्रत्यक्ष शिक्षकांमध्येही एकवाक्यता आणि संयुक्त प्रयत्नांची गरज आहे.
जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे योग्य नियोजन आणि विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी-सुविधा पुरविणे गरजेचे बनले आहे. इंग्रजी शाळेच्या तोडीचा अभ्यासक्रम आणि अध्यापन पद्धती असल्यास कोणताही पालक अधिक पैसे खर्च करून खासगी शाळांकडे धाव घेणार नाही. जिल्हा परिषद शाळांना ऊर्जीतावस्था यावयाची असेल तर शिक्षकांमध्ये समर्पणाची भावना असणे आवश्यक आहे. तेव्हाच विद्यार्थी व पालक पुन्हा एकदा जिल्हा परिषद शाळांकडे वळण्यास बाध्य होतील. जिल्हा परिषदेच्या शाळांना पुन्हा सोन्याचे दिवस येण्यासाठी सध्या कार्यरत शाळा व्यवस्थापन समित्यांनी अधिक दक्ष होण्याची गरज आहे.