गुवाहाटीचे विमान खुणावतेय.. पण तिकिटाचे पैसेच नाही! गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षक आले धावून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2022 10:48 AM2022-10-22T10:48:56+5:302022-10-22T10:59:03+5:30
आयआयटीसाठी निवड, जाण्याची तयारी पण..
अविनाश साबापुरे
यवतमाळ : गुवाहाटी म्हटले की महाराष्ट्राला शिवसेनेतील उलथापालथच आठवते. रातोरात आमदार विमानात बसून गुवाहाटीला गेले. पण याच महाराष्ट्रातील एका गुणवान विद्यार्थ्याची गुवाहाटीच्या आयआयटीसाठी निवड झाली अन् त्याच्याकडे गुवाहाटीत पोहोचण्याची सोयच नव्हती. कोणतेच सरकार त्याच्या मदतीसाठी नाही आले. शेवटी त्याला जिल्हा परिषद शाळेत शिकविणारे गुरुजीच धावून आले. त्यांनी वर्गणी केली अन् तिकिटाचीच नव्हेतर जेवणा-राहण्याच्या खर्चाचीही सोय करून दिली.
काय घडले नेमके अन् कोण तो विद्यार्थी? रोजमजुरी करून जीवन जगणाऱ्या कुटुंबात जन्माला आलेल्या संदेश जोगदंडे या विद्यार्थ्याची ही संघर्षगाथा आहे. पुसद तालुक्यातल्या दगडधानोरा हे त्याचे छोटेसे खेडेगाव. जिल्हा परिषद शाळेत शिकल्यावर गुणवत्तेच्या बळावर तो नवोदयमध्ये पोहोचला. आता बारावीनंतर त्याची निवड थेट गुवाहाटीच्या देशातील नामवंत आयआयटीमध्ये झाली आहे. आपल्या लेकाची इतक्या मोठ्या संस्थेत निवड झाल्याचे कळल्यावर आईवडिलांना जसा आनंद झाला, तसाच त्यांच्यापुढे अडचणीचा डोंगरही उभा राहिला. कारण निवड तर झाली, पण पोराला पाठवायचे कसे? जवळ छदामही नाही.
गावातील ज्या झेडपी शाळेत संदेश शिकला, त्याच शाळेतील मुख्याध्यापक सुधीर भुस्कुटे, मंगेश टिकार, सदानंद गिरी, बाजूच्या शेंबाळपिंपरी गावातील शिक्षक शुद्धोधन कांबळे यांच्या कानावर ही वार्ता गेली. त्यांनी लगेच पुसदचे बीडीओ गजानन पिल्लेवाड, गटशिक्षणाधिकारी संजय कांबळे यांची भेट घेतली. संदेशसाठी काही मदतीचा स्रोत आपण उभा करू शकतो का, या विषयावर बीडीओ, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांनी लगेच एक बैठक घेतली. अन् क्षणात एक भरघोस मदत नगदी स्वरूपात उभी राहिली. संदेश जोगदंड या विद्यार्थ्याला लगेच बीडीओंच्या कक्षात बोलावून त्याला मदत देण्यात आली.
सोशल मीडियाचा सकारात्मक वापर
पंचायत समितीमध्ये बैठक घेऊन मदत देण्यासोबतच मंगेश टिकार, शुद्धोधन कांबळे या शिक्षकांनी व्हाॅट्सॲप ग्रुपवर मदतीसाठी आवाहन करणारे मेसेज टाकले. त्यातूनही संदेश जोगदंड या विद्यार्थ्याला भरघोस मदत मिळाली. सोशल मीडियाचा सकारात्मक वापर किती उपयुक्त ठरू शकतो, हेही या शिक्षकांनी दाखवून दिले. समाजातील दानशूर व्यक्तींनी अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत मदतीसाठी समोर यावे, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी संजय कांबळे यांनी केले.
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीसुद्धा उच्च गुणवत्ता प्राप्त करू शकतो. ग्रामीण भागात राहूनसुद्धा आकाशाला गवसणी घालता येते, हा संदेश संदेशच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचला आहे.
- गजानन पिल्लेवाड, गटविकास अधिकारी, पुसद