खेड्यातला शिक्षक होणार शहराचा मुख्याधिकारी; एमपीएससी केली सर
By अविनाश साबापुरे | Published: March 18, 2023 10:54 AM2023-03-18T10:54:39+5:302023-03-18T10:56:24+5:30
झेडपी शिक्षकाचे यश : एनटी प्रवर्गातून राज्यात दुसरा क्रमांक
यवतमाळ : जन्मही खेड्यात अन् नोकरीही खेड्यातच... पण स्वप्न खेड्याच्या पलीकडची दुनिया कवेत घेण्याचे.. अखेर ते स्वप्न हळूहळू का होईना साकार झालेय. छोट्याशा खेड्यात शिक्षक असलेल्या विनायक घुगे यांनी एमपीएससीची परीक्षा सर केली. नुसती उत्तीर्णच नाही केली तर राज्यातून दुसरा क्रमांकही पटकावला. त्यांना अतिशय चांगली रँक असल्याने सहायक कामगार आयुक्त, बीडीओ अशा क्लास वन पोस्टवर काम करण्याची संधी मिळू शकणार आहे. मात्र, या शिक्षकाने थेट सर्वसामान्य लोकांसाठी काही तरी करता यावे म्हणून नगरपालिका मुख्याधिकारी या पदाला प्राधान्य दिले आहे.
विनायक घुगे हे सातघरी (ता. महागाव) येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक आहेत. वाशीम जिल्ह्यातील वाकदवाडी हे छोटेसे खेडे त्यांचे मूळ गाव. तेथेच झेडपी शाळेत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. पुढच्या शिक्षणासाठी ते यवतमाळात आले. डाॅक्टर होण्याचे त्यांचे स्वप्न होते, पण लवकर नोकरी मिळावी म्हणून त्यांनी यवतमाळात डी.एड्. केले. लगेच यवतमाळ जिल्हा परिषदेतच त्यांना शिक्षकाची नोकरी मिळाली. २००९ मध्ये सातघरीच्या शाळेत रुजू झाले. विद्यार्थ्यांना शिकवता-शिकवता ते स्वत:ही शिकत राहिले. मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. मग बी.एड्. झाले. याच दरम्यान पूजा नामक जीवनसाथीशी २०१४ मध्ये त्यांचे लग्न झाले. संसारवेलीवर श्रेयस आणि श्रेया ही दोन फुले उगवली.
एकीकडे शाळेतील विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम, दुसरीकडे स्वत:च्या लेकरांच्या जबाबदाऱ्या, तर तिसरीकडे मूळगाव वाकदवाडीतील जबाबदाऱ्या सांभाळत-सांभाळत विनायक घुगे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारीही करीत होते. त्यात थोड्याफार फरकाने अपयश येत राहिले, पण न डगमगता त्यांनी मेहनत घेतली आणि २०२२ च्या एमपीएससी परीक्षेत त्यांनी यश मिळविलेच. या परीक्षेचा निकाल २८ फेब्रुवारीला लागला. त्यांना ५६७ गुण मिळाले असून महाराष्ट्रातून ५१ वी, तर एनटी प्रवर्गातून त्यांनी राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. मुलाखतीतही ते उत्तीर्ण झाले.
१० मार्चपर्यंत आयोगाने त्यांच्याकडून विविध प्रशासकीय पदांचे प्राधान्यक्रम भरून घेतले. त्यात दुसऱ्या रँकमुळे घुगे यांना अनेक पदांची संधी आहे. मात्र, सामान्य लोकांसोबत राहून त्यांच्या जीवनात काहीतरी सुधारणा करता यावी, या उदात्त हेतूने घुगे यांनी नगरपालिका मुख्याधिकारी पदाचा पसंतीक्रम दिला आहे.
टेलरिंग काम करत शिक्षण
विनायक घुगे यांचे वडील गजाननराव हे वाकदवाडी गावात टेलरिंग काम करायचे. लहानगा विनायक त्याच दुकानात बसून वडिलांना मदतही करायचा आणि अभ्यासही करायचा. आई रामकोर घरच्या कोरडवाहू साडेतीन एकर शेतात कामाला जायच्या. अत्यंत हलाखीशी झगडत विनायक घुगे शिक्षक झाले. त्यानंतर जबाबदाऱ्या सांभाळत एमपीएससी उत्तीर्ण होऊन आता मुख्याधिकारी पदावर विराजमान होणार आहेत. दररोज सकाळी शाळेपूर्वी दोन तास आणि सायंकाळी शाळा सुटल्यानंतर तीन तास, तर रविवारी संपूर्ण दिवस असा त्यांनी एमपीएससीकरिता झपाटून अभ्यास केला. उन्हाळ्याच्या सुटीतही मूळगावी न जाता पूर्णवेळ अभ्यासाला दिला.
एमपीएससीसाठी क्लासेस लावण्यापेक्षा मी सेल्फ स्टडीवर भर दिला, पण विविध पदावर असलेल्या अनेक मित्रांचे मला खूप मार्गदर्शन मिळाले. येणाऱ्या काळात खेड्यापाड्यातील मुलांसाठी यूट्यूबद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. यवतमाळच्या डी.एड्. विद्यालयात बरेच शिकायला मिळाले. यापुढेही मला यवतमाळ जिल्ह्यातच मुख्याधिकारी म्हणून नोकरी करण्याची इच्छा आहे.
- विनायक घुगे, शिक्षक, सातघरी