झेडपीचे शिलकीचे अंदाजपत्रक मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2022 05:00 AM2022-03-28T05:00:00+5:302022-03-28T05:00:10+5:30

बांधकाम विभाग क्र. १ साठी ३ कोटी ६२ लाख तर क्र. २ साठी १ कोटी ६८ लाख ५० हजारांच्या खर्चाची तरतूद अंदाजपत्रकात आहे. सिंचन विभागासाठी ७२ लाख ५० हजार तर सार्वजनिक आरोग्यासाठी ३८ लाख, आरोग्य अभियांत्रिकीसाठी २५ लाख तर कृषी योजनांसाठी दोन कोटी २७ लाख ६३ हजारांची तरतूद करण्यात आली.

ZP's balance budget approved | झेडपीचे शिलकीचे अंदाजपत्रक मंजूर

झेडपीचे शिलकीचे अंदाजपत्रक मंजूर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषदेचे २०२१-२२ चे सुधारित आणि २०२२-२३ च्या मूळ अंदाजपत्रकाला रविवारी मंजुरी देण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी रविवारी विविध विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत अंदाजपत्रक सादर केले. 
२०२१-२२ मध्ये २४ कोटी ८४ लाख ३१ हजारांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले होते. मात्र वर्षभरात हे अंदाजपत्रक २५ कोटी नऊ लाख ४० हजार ९० रुपयांवर पोहोचले. या सुधारित अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. सीईओ डॉ. पांचाळ यांनी २०२२-२३ साठी २५ कोटी ७५ लाख ८५ हजार रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले. त्यात विविध योजनांसाठी तरतूद करण्यात आली. 
बांधकाम विभाग क्र. १ साठी ३ कोटी ६२ लाख तर क्र. २ साठी १ कोटी ६८ लाख ५० हजारांच्या खर्चाची तरतूद अंदाजपत्रकात आहे. सिंचन विभागासाठी ७२ लाख ५० हजार तर सार्वजनिक आरोग्यासाठी ३८ लाख, आरोग्य अभियांत्रिकीसाठी २५ लाख तर कृषी योजनांसाठी दोन कोटी २७ लाख ६३ हजारांची तरतूद करण्यात आली. पशुसंवर्धन विभागासाठी १ कोटी ११ लाख ५० हजार, समाज कल्याण विभागासाठी २ कोटी ४५ लाख ५५ हजार, अपंग कल्याणासाठी १ कोटी १४ लाख १ हजार तर महिला व बालकल्याण विभागासाठी १ कोटी ४० लाख १ हजारांची तरतूद करण्यात आली. सामूहिक विकासासाठी १ कोटी ४० लाख तर संकीर्ण खर्चासाठी तब्बल ४ कोटी २३ लाखांची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली. याशिवाय सामान्य प्रशासन, शिक्षण विभाग, निवृत्ती वेतन आदींसाठीही तरतूद करण्यात आली आहे. २०२२-२३ च्या अंदाजपत्रकात महसुली खर्च २५ कोटी ७५ लाख ८५ हजार, भांडवली खर्च पाच कोटी ४२ लाख रुपये होणार असल्याचे अंदाजपत्रकात नमूद करण्यात आली. या खर्चानुसार गेल्यावर्षीपेक्षा हे अंदाजपत्रक १ लाख ४० हजार ७५० रुपये शिलकीचे ठरले आहे. 
दरवर्षी अर्थ समितीचे सभापती अंदाजपत्रक सादर करतात. मात्र यावेळी पदाधिकाऱ्यांची मुदत २० मार्च रोजी संपतुष्टात आली. त्यामुळे प्रशासक म्हणून सीईओंच्या हाती सर्व सूत्रे एकवटली आहे. त्यांनीच रविवारी नवीन अर्थसंकल्प सादर केला. अधिकाऱ्यांच्या सभेत त्याला मंजुरीही देण्यात आली. 

‘सुंदर माझे कार्यालया’साठी ५० लाख 
यावर्षीच्या अंदाजपत्रकात सीईओंनी सुंदर माझे कार्यालयासाठी तब्बल ५० लाखांची तरतूद केली आहे. अंदाजपत्रकात विविध नावीन्यपूर्ण योजनांसाठी तरतूद करण्यात आली. त्यात आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत विविध उपक्रमांसाठी २५ लाख, महादीप योजनेसाठी २५ लाख, झेप उपक्रमासाठी २० लाख, बाला योजनेसाठी २५ लाख, सहस्त्रकुंड पर्यटनस्थळाच्या विकासासाठी २० लाख, हुतात्मा स्मारकाच्या देखभाल दुरुस्तीसाठी २ लाख तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती वास्तूंच्या सौरविद्युतीकरणासाठी ५० लाखांची तरतूद केली आहे. याशिवाय मागासवर्गीय आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना कृषी अवजारे पुरविण्यासाठी ५० लाख, तीन हेक्टरपर्यंतच्या भूधारकांसाठी विविध योजना राबविण्यासाठी १ कोटी २० लाख आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी कृषिपयोगी यंत्रे, बियाणे व अवजारे वाटपासाठी एक कोटींची तरतूद केली आहे. 

अनेक नावीन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश करून अंदाजपत्रकाचा उद्देश सफल करण्याचा प्रयत्न केला. वैयक्तिक योजनांमध्ये ३० टक्के महिला लाभार्थी असणे सक्तीचे करून शासनाच्या महिला धोरणाला पूरक अंदाजपत्रक सादर केले. दिव्यांग महिला, बालके, मागासवर्गीय आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाकरिता वैशिष्ट्यपूर्ण योजना राबवून विकासाची नवीन दिशा ठरविण्याकडे एक आशादायक पाऊल म्हणून २०२२-२३ चे मूळ अंदाजपत्रक सादर केले. 
- डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, 
सीईओ, जिल्हा परिषद, यवतमाळ.

 

Web Title: ZP's balance budget approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.