भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण आणि साजरा करण्याच्या पद्धती या शास्त्र, विज्ञानाशी निगडित आहे. अमुक सणादिवशी हे करा, ते करू नका, हे आग्रहपूर्वक सांगणे केवळ सर्वंकष मानवी हितासाठीच असते. आता पाहा ना, दिवाळीच्या नरक चतुदर्शीच्या दिवशी अभ्यंगस्नान करायला आपल्या शास्त्राने सांगितले आहे. ते का? तर सकाळी सूर्योदयाच्या आधी झोपेतून उठणे आणि वातावरणात अधिकाधिक प्रमाणात असलेला प्राणवायू शरीरातील प्रत्येक धमन्यांपर्यंत श्वासाद्वारे पोहोचविणे, हे आरोग्यदायी असते, शिवाय तेलाची मालीश करणे आणि आंघोळ करताना उटणे लावणे, हेही त्वचेसाठी हितकारक असते.दिवाळीतील अभ्यंगस्नानाचे धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्त्व काय, या प्रश्नावर वेदशास्त्र संपन्न हरिभाऊशास्त्री जोशी सांगतात की, भागवत पुराणातील कथेनुसार या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला. नरकासुर हा अत्याचारी दैत्य होता. त्याचा वध करण्यासाठी जेव्हा भगवान कृष्णाने प्रहार केला. तेव्हा या राक्षसाने वर मागितला. श्रीकृष्ण म्हणाले, ‘हे दैत्या, आजच्या चतुर्दशीच्या दिवशी जो कोणी पहाटे अभ्यंगस्नान करेल, त्याला नरकयातना मिळणार नाहीत, तसेच अशा यातनेतून त्याची मुक्ती होईल.’ पुराणातील भगवान कृष्णाच्या या वरदानाला शिरसावंद्य मानून भारतीय संस्कृतीत अभ्यंगस्नानाची प्रथा रूढ झाली.दिवाळीच्या काळात थंडीचे वातावरण असते. या काळात त्वचा कोरडी पडते. त्यामुळे अंगाला तेल लावून स्नान केल्यामुळे त्वचेला तजेला येतो. शिवाय शरीरावरील सुरकुत्याही कमी होतात. तेल हे नेहमी सुगंधी असते. या सुगंधामुळे एक प्रसन्न आणि सकारात्मक मानसिकता निर्माण होते, असेही शास्त्रीजींनी सांगितले.अभ्यंगस्नान असे केले जाते...अभ्यंगस्नानाच्या पद्धती प्रत्येक कुटुंबात वेगवेगळ्या असल्या, तरी बहुसंख्य घरांमध्ये खालील पद्धतीचा वापर होतो-व्यक्तीला पाटावर बसविले जातेशरीराला सुगंधी तेलाचे मालीश केले जाते.कपाळाला कुंकुमतिलक लावून ओवाळले जातेपाटावर बसवून स्नान घातले जातेस्नान घालताना सुगंधी उटणे शरीराला लावले जातेस्नान झाले की, पुन्हा दिव्याने ओवाळले जाते.उटण्यामधील मिश्रणउटणे खास पद्धतीने बनविले जाते. यामध्ये शिकेकाईचा सर्वाधिक वापर असतो. शिकेकाईच्या बियांची पावडर तयार करून, त्यामध्ये वाळा, ज्येष्ठमध, आंबेहळद, तुळशीची पाने आणि थोडासा कापूर मिसळला जातो.- रवींद्र देशमुख
अभ्यंगस्नान...पवित्र अन् आरोग्यदायी!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2018 4:17 AM