घरचे कुलदैवत हे आईसारखे असते, त्याला सोडून लोक भलत्याचीच आराधना करतात. त्यामुळे कुलदेवाचा कोप होतो. कुणी कोणत्या देवाची आराधना करावी हा ज्याचा त्याच्या श्रद्धेचा प्रश्न असतो. त्याच्या श्रद्धा व भक्तीनुसार त्याचे कमी जास्त फळ मिळतेच, पण माणसानाच देव मानून त्यांचा उदोउदो करणे हे योग्य नाही.
कुलदेवतेच्या आराधनेशिवाय केलेल्या इतर देवदेवतांचे पूजन लाभत नाही. कुलदेवाला विसरलात तर कुटुंबाचा उद्धार कधीही होणार नाही. काही कुलदैवत सौम्य तर काही उग्र असतात पण त्यांना डावलून जर इतर पूजाअर्चा, साधूसंतांची आराधना केली तर कुलदेवतेचा कृपाशीर्वाद नसल्याने इतर आराधना म्हणावे तसे यश देऊ शकत नाहीत. ज्यांना कुलदैवत माहित नाही, त्यांनी काय करायचे असा प्रश्न पडतो. गावोगाव फिरत जाणाºया काही लोकांच्याकडून कुलदेव समजते असे म्हणतात पण ते लोक स्वत: अशिक्षित असतात. मग त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा असाही प्रश्न पडतो. त्यालाही उपाय आहेत.
ज्याना आपले कुलदैवत माहित नाही त्यानी कोठेही कुलदैवत शोधण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी काही पर्याय आहेत. त्यानुसार आराधना केल्यास कुलदेवाची कृपा निश्चित लाभू शकते. तुम्ही कितीही श्रीमंत, बुद्धिमान, हुशार असाल, सुखसमृद्धीचे मालक असाल पण कुलदेवाला कधीही विसरु नका अथवा कुलदैवत सोडून इतर आराधनाही करू नका. कुलदेवतेची नित्य नियमित आराधना, पूजाअर्चा, कुलाचार व्यवस्थित चालू असतील तर कोणत्याही संकटातून आपले रक्षण होते किंवा त्यावेळी कोणती आराधना करावी याची सूचना कुलदैवताकडून नकळत मिळत जाते व संकटातून मार्गही सुचत जातो.
कोणत्याही तीर्थक्षेत्री अथवा मंदिरात गेल्यावर कुलदेवाचे स्मरण करण्यास विसरु नका. अन्यथा तीर्थक्षेत्रीय देवतांचा कृपाशीर्वाद मिळत नाही. काही साधू संत अथवा धार्मिक संस्था तर कुलदेवाची आराधना सुद्धा करण्याची गरज नाही, असे तत्वज्ञान शिकवितात. कृष्णाची आराधना करणाºया बहुतेकांना गीतेत भगवान श्रीकृष्णाने काय तत्व सांगितलेले आहे, हेच माहीत नसते. आम्ही कृष्णाच्या नावाने गंध लावतो, त्याची पूजा करतो, त्याच्या भक्तीत तल्लीन होऊन नाचतो पण गीतेत काय सांगितले आहे, गीतेचा मतितार्थ काय आहे हे आम्हाला माहित नाही. आम्हाला फक्त कृष्णाची भक्ती करण्यास शिकवितात. पण मोठमोठे साधू, संत गीतेचे महत्त्व काय ते शिकवीत नाहीत, असे अनेकजण प्रांजलपणे कबूल करतात. गीतेतील एकेक अध्याय रोज वाचला तरी त्याच्यावर भगवंताची निस्सीम कृपा होते़ प.पू. श्री गुरूनाथ कंटीकर महाराज,शेळगी, सोलापूर..