- प्रा. शिवाजीराव भुकेलेजशी भावना आपल्या अंतरंगात असेल, तसेच फळ आपणास मिळते. चंद्रकिरणांतून स्रवणाऱ्या अमृतमय आनंदाचा आस्वाद घेण्याऐवजी जर त्याच्यावरचा डाग शोधत बसलो, तर सर्वत्र डागाचेच साम्राज्य दिसेल. भक्तीच्या क्षेत्रातसुद्धा शुद्ध भावाला आत्यंतिक महत्त्व आहे. पदराला पीळ घातला की बापसुद्धा निर्बल होतो, तसे उत्कट भावाने भक्ताने जर भगवंताला साद घातली, तर तो भक्तांच्या जीवनात आनंदाचे माहेरघर निर्माण करतो. सकृतदर्शनी भावाच्या एकत्वाचे जरी वर्णन करण्यातआले असले, तरी भक्ताच्या मनोभूमिकेतील भावाच्या अनन्यतेचे वर्णन करताना श्रीमद् भगवतगीतेमध्ये म्हटले आहे -अनन्य श्चिन्तयन्तो मां ये जना पर्युपासते ।तेषां नित्याभियुक्तांना योग क्षेमं वाहम्यहम ।जे भक्त माझ्या रूप, गुण, कर्मावाचून दुसरे काहीच जाणत नाहीत, अनन्य भावाने माझ्या चरणी सर्वस्व अर्पण करतात, त्यांचा योग-क्षेम वाहण्याचे व त्यांच्या भावनेप्रमाणे फळ देण्याचे कार्य मी करतो. भगवंताच्या या वचनावरूनच सिद्ध होते की, आपल्या आंतरिक ज्ञानरूप परमात्म्याला जाणणाऱ्यांचा वर्ग वेगळा. त्याला फक्त दुरून पाहणाºयांचा वर्ग वेगळा. फक्त ऐकीव माहितीवर डोळे झाकून विश्वास ठेवणाºया अंधभक्तांचा वर्ग वेगळा. आपल्या देशात तर आज नाना धर्म, पंथ-संप्रदायाचे उदंड पीक आलेले आहे. निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे आणि माणसानेच माणसाला हीन ठरविल्यामुळे जीवदायक अन्नधान्याचे ‘पीक’ कमी होऊ लागले आहे. वर्षानुवर्षांपासून कोरड्या दुष्काळाची चाहूल लागली आहे; पण पोट पाठीला चिकटलेली माणसेसुद्धा एखाद्या धर्मपंथाच्या पंगतीला जाऊन बसू लागली आहेत, तर श्रीमंत मंडळींचा फावल्या वेळेचा उद्योग म्हणून आज अनेकांच्या सत्संगाचे महोत्सव संपन्न होत आहेत. पण भाव-भक्तीचे विवेकी अधिष्ठान लाभलेले जगद्गुरू तुकोबाराय म्हणाले होते,देखण्याच्या तीन जाती, वेठी वार्ता वर्तन्ती ।भाव तैसे फळ स्वाती तोय एक जळ ।पाहें सांगे आणि जेवीं, अन्तर महदान्तर तेवी ।तुका म्हणे हिरा, पारखिया मूठ गारा ।
अंतरात जशी भावना तसेच मिळते फळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 5:38 AM