- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)स्तुती आणि प्रार्थना यांचा परस्पर संबंध आहे. कामनापूर्तीसाठी प्रार्थना केली जाते, तर कामना पूर्ण व्हावी यासाठी प्रार्थना केली जाते; परंतु साधनाहीन प्रार्थना सर्वदा निरर्थक ठरते. प्रार्थना रोज करावी. प्रार्थनेने मनुष्याला आत्मिक शांती मिळते. प्रार्थना स्वत: किंवा सामूहिक करा. सामूहिक प्रार्थनेत एक वेगळी शक्ती निर्माण होते. ऊर्जावलयं कित्येक पटीने निर्माण होतात. त्यामुळे परिवार, समाज, राष्ट्र यांना एक नवचैतन्य प्राप्त होते. प्रार्थना केल्यामुळे ती ऊर्जा आपल्या शुभकार्यात मदत करते. म्हणून तर ज्ञानदेवांनी वैश्विक प्रार्थना केली.जो जशी कामना करतो तसे त्याला फळ मिळते. प्रार्थनेत अमोघ शक्ती आहे. प्रार्थनेमुळे साधक प्रबळ बनतो. सुदृढ राहातो. इच्छाशक्ती, आत्मशक्ती जागृत होते. एक सर्वव्यापी परमात्मा त्याची प्रार्थना महत्त्वाची आहे. हा जीवनरथ सुखी-संपन्न करायचा असेल तर प्रार्थना करावी. जीवनात रमणीय सृष्टी निर्माण होते. कर्म चांगले पडते. चांगले कर्म घडले की आत्मशक्तीचा विकास होतो. जीवन संकुचित मार्गाने आपण जगत नसतो. प्रार्थनेतून दिव्यातिदिव्य संदेश मिळतात. आपल्याला कर्तव्याची जाणीव होते. जीवनात आनंद उपभोगता येतो. प्रार्थनेमुळे आपले जीवन नष्ट-भ्रष्ट होत नाही. जीवनात नास्तिकता येत नाही. आपल्या हातून अधर्माचरण घडत नाही. प्रतिदिन प्रार्थना केल्यास जीवनक्रांती प्रकाशमान होते. जीवनात एक आदर्श पद्धती निर्माण होते. आपण प्रार्थनेमुळे नेहती प्रसन्न राहातो. जीवन छिन्न-विछिन्न होत नाही. प्रार्थनेमुळे मनात प्रसन्नता निर्माण होते.प्रसन्न मन जीवन प्रकाशमान व तेजस्वी करते. साधकाला सुबोध होतो. स्वयंभू असलेल्या आत्मस्वरूपाचे रूप हळूहळू लक्षात येते. जीवनरूपी यज्ञात आत्मरूपी कुंडात सुमंगलेच्या आहुती दिल्या जातात. त्यामुळे मन, बुद्धी, चित्त, अहंकार यावर विजय प्राप्त करण्यासाठी आत्मिक बळ मिळते. आत्मिक बळ सर्व बळांत श्रेष्ठ बळ आहे. आत्मबळ सर्व बळांचे मुख्य बळ आहे. त्यामुळे आत्मिक बळ निर्माण होण्यासाठी प्रार्थना महत्त्वाची आहे. नि:संदेह ईश्वराची प्रार्थना करा, जीवन उज्ज्वल होईल.
आध्यात्मिक : साधनाहीन प्रार्थना निरर्थक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2019 11:28 AM