वारकरी संप्रदाय म्हणजे एक सामाजिक क्रांतीच होय. संप्रदायाने जातिनिरपेक्ष आध्यात्मिक विचार समाजाला दिले आहेत. वर्णव्यवस्था राखूनही वर्गविग्रहाची वेळ येऊ दिली नाही. या वारक-यांमध्ये सर्व जातींचे संत होऊन गेले. सर्व संतांबद्दल वारकºयांच्या मनात तेवढाच भक्तिभाव आणि आदर आहे. त्यांचे कार्य आणि शिकवण हाच तर या संप्रदायाचा मूळ गाभा आहे.
आज इतकी वर्षे लोटली, खेड्यांचे शहरीकरण झाले, शहरांचे औद्योगिकीकरण झाले; पण वारकºयांच्या दिंड्यांचा उत्साह कमी झालेला नाही. कर्मकांडात देव अडकलेला नसून, केवळ भक्तियुक्त नामस्मरणाने तो मिळविता येतो, अशी शिकवण सर्व संतांनी दिली. वारीच्या निमित्ताने सर्व वारकरी चंद्रभागेच्या वाळवंटात एकत्र येतात. तेच वारकरी संप्रदायाचे व्यासपीठ तथा ज्ञानपीठ आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. त्या वाळवंटात आध्यात्मिक, धार्मिक, तत्त्वज्ञानात्मक शिकवण संतांनी लोकसमूहासमोर मांडली, सामाजिक समन्वयाची शिकवणही वारक-यांना येथेच मिळते.
लौकिक जीवनातील सर्व कर्मे परमेश्वरार्पण बुद्धीने करणे, पारमार्थिक जीवनाचा विकास करणे, समाजाची एकसंधता टिकवण्याचा प्रयत्न या वारकरी संप्रदायाने केला आहे. या विज्ञान युगातदेखील वारी टिकून आहे. या वारीत आजही शिकलेले, न शिकलेले, सर्व वयोगटांतील स्त्री-पुरुष सहभागी होतात, हेच वारकरी संप्रदायाचे श्रेष्ठत्व, पयार्याने चिरंजीवित्व आहे, हे मान्य करावे लागेल.ह.भ.प वसंतराव कासे महाराज,सोलापूर