भज गोविन्दम - ८
यावत्पनो निवासति गेहे तावतपृच्छति कुशलं गेहेगतवती वायौ देहापाये, भार्या बिभ्यति तस्मिन कायेभज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मुढमते...॥ध्रु॥
या श्लोकात जीवनातील वास्तव प्रतिपादन केले आहे. जोपर्यंत या देहात प्राण आहे, श्वास आहे, तोपर्यंतच तुमची घरातील लोक विचारपूस करतात. एकदा का तुमच्या शरीरातील प्राण, श्वास निघून गेला की मग या देहाला घरात कोणी ठेवीत नाहीत. लवकरात लवकर घराबाहेर काढतात व स्मशानात नेवून त्याचे दहन करतात. जीवनभर कितीही तुमच्यावर प्रेम केलेले असू द्या, प्रेतरूप शरीराला घरात ठेवीत नाहीत़ इतकेच काय तर जी पत्नी आयुष्यभर तुमच्यावर प्रेम करते ती सुद्धा त्या प्रेताला हात लावीत नाही. उलट ती घाबरते. आणि समजा ठेवले तरी त्यामध्ये चैतन्य येत नाही. ते प्रेत जिवंत होत नाही. हजारो वर्षापूर्वी इजिप्तमध्ये पिऱ्यामिडमध्ये राजे लोकांचे देह ठेवण्याची प्रथा होती व त्याबरोबर दाग दागिने ठेवायचे़ त्याच्या आवडत्या वस्तू ठेवायचे. पण आता संशोधन झाले आणि ते पिऱ्यामिड खोदून बघितले तर त्या ममी म्हणजे जतन केलेले प्रेत तसेच होते. ते काही जिवंत झालेले दिसले नाही. तात्पर्य जोपर्यंत शरीरात प्राण आहे. तोपर्यंतच लोक या देहाला जपतात़ नंतर कोणी विचारीत नाही, हे वास्तव आहे. पण याचा कोणी विचार करीत नाही. एके ठिकाणी फार छान सांगितले आहे, ‘ऐक चतुरा सोड फुगारा उत्तम नरदेही, भरला मायेचा बाजार जगामध्ये आपल कोणी नाही.’ या मायेच्या बाजारात आपले कोणी नाही फक्त आपले आहेत असे भासते.संत ज्ञानोबाराय म्हणतात,
माता-पिता, बंधु-बहिणी कोणी न पवती निर्वाणी।इष्टमित्रस्वजनसखे हे तो सुखाची मांडणी।एकला मी दु: ख भोगी कुंभपाक जाचणी।तेथे कोणी सोडविना एका सद्गुरुवांचुनी।धर्म जागो सदैवाचा जे बा परोपकारी॥
अंतकाळी कोणीही वाचवू शकत नाही़ फक्त एक सद्गुरूच वाचवितात़ म्हणजे ते काही जिवंत करीत नाहीत़ पण मृत्य सुकर करतात व या देहाचे मिथ्यत्व पटवून देतात. त्यामुळे देह सोडताना सुद्धा दुख: होत नाही़ उलट हा देह माझा नाही हे कळते. देह पंचमहाभूतांचा आहे. देह कोणाचाच या इहलोकात राहू शकत नाही. श्री ज्ञानोबारायांनी मदालसा नावाच्या सुंदर प्रकरणातील अभंगात देहाचे मिथ्यात्व प्रतिपादन केले आहे़ ते म्हणतात,
‘हा देह नाशिवंत मळमुत्रांचा बांधावरी चर्म घातलें रे कर्म कीटकांचा सांदारवरव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधास्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा॥५॥या देहाचा भरवसा पुत्रा न धरावा ऐसामाझें माझें म्हणोनियां बहु दु:खाचा वळसाबहुत ठकियेले मृगजळाच्या आशातृष्णा सांडूनिया योगी गेले वनवासा ॥६॥
मदालसाने आपल्या मुलांना पाळण्यातच हा उपदेश केला आणि विशेष म्हणजे तिचे पुत्र हा उपदेश ऐकून संन्यासी झाले. म्हणून देहाचे नश्वरत्व कळावे आणि आता तर सध्या कोरोनाची साथ सुरु आहे. जगातील सर्व लोकांना कळून चुकले की मानवी जीवन हे किती पराधीन आहे़ पैसा, धन द्रव्य काहीही उपयोगाला येत नाही. कोरोना झालाय एव्हडे जरी कळाले तरी कोणीही जवळ येत नाही आणि कदाचित जर माणूस कोरोनाने मेला तर त्याच्या प्रेताला सुद्धा हातही लावीत नाही. कुठलेही धार्मिक संस्कार होत नाहीत. लगेच उचलतात आणि स्मशानात नेवून चितेवर ठेवतात.
नको नको मना गुंतू माया जाळी। काळ हा आला जवळी ग्रासावया॥१॥काळाची ही उडी पडेल बा जेव्हा। सोडविना तेव्हा माय बाप॥२॥सोडविना राजा देशीचा रे चौधरी। आणिक सोयरी भली भली॥३॥तुका म्हणे तुला सोडविणा कुणी। एका चक्रपाणी वाचुनी॥४॥
म्हणून हे मानवा या मायेत तू अडकू नको व देह तादात्म्य सोडून देवून जीवनमुक्तीचा मार्ग धर. म्हणजे तू सहज मुक्त होशील आणि अशा वेळी हे मानवा तू प्रेमाने गोविंदाचे भजन कर. म्हणजे मग तुला खरे समाधान मिळेल.