मनुष्याचा स्वभाव त्याच्या मनावरून ठरतो. परस्पर प्रेम आणि सद्भावना याचाही परिचय मनावरच अवलंबून असतो. महान तेजस्वी आणि सामर्थ्यवान कर्म करने, हीसुद्धा मनाचीच शक्ती असते. मोक्षप्राप्ती असो अथवा उन्नती असो या सर्वांना कारणीभूत मन असते. आपल्या जीवनात घडणारी प्रत्येक घटना किंवा कृती याचा अनुमान मनावरच असतो. मन:शक्ती प्रबळ असली की मनुष्य श्रेष्ठ ठरतो. मनुष्याचे प्रयत्न त्या मन:शक्तीशी एकरूप व्हावे लागतात. तेव्हाच उत्तम गुणांनी, विद्वत्तेने एखादी चांगली कृती घडते. आपली बुद्धी सात्त्विक बनावयची असेल तर मनानी सत्कर्म केले पाहिजे. मन एकदा सात्त्विक बनले की विनाशकारी गोष्टींचे भय राहात नाही. सत्य मार्गावर चालून आत्मिक उन्नती साधली जाते. प्रकृती नियमानुसार मनुष्याची हानी, लाभ, शुभ-अशुभ दिव्य शक्ती, असुरी शक्ती, पाप भावना निंदायोग्य दुष्कर्म, परब्रह्माचे ज्ञान, भौतिक विज्ञान, आत्मिक तत्त्वज्ञान इत्यादी गोष्टींचे मूल्यमापन मनुष्याच्या मनावरून ठरते. कारण मन चांगले असले की सात्त्विक विचार निर्माण होतात.
सात्त्विक विचार मनुष्याच्या पुरुषार्थाला लक्ष्य बनवतात. मनुष्य स्वयं आपल्या मनानुसार वागतो. काही गोष्टी मनासारख्या होतात, तर काही मनाविरुद्ध घडतात. अशावेळी मनावर लगाम घातला पाहिजे. कारण ऋग्वेदात म्हटले आहे ‘मनुष्य ज्या गोष्टीत मन लावतो, ती गोष्ट, तो पुरुषार्थ प्राप्त करत असतो.’ म्हणून योग्य गोष्टीकडे मनाला लावा. मग मनातून विषय भोग, चिंता, दु:ख नष्ट होतील अन् विश्वासपूर्वक आनंद उपभोगाल! मनुष्य जीवनात अनेक अडचणी येतात. या सर्वांवर मात करून आपण आपला मार्ग अवलंबावा आणि विश्वासपूर्वक जीवन जगावे. व्यर्थ शोक न करता, उन्माद न करता शुद्ध स्वरूपात जीवन जगा म्हणजे आपल्या लक्ष्यावर मन केंद्रित करा. अन् सुख-शांतीचा मार्ग अवलंबावा.
डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज
(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)