वामनराव देशपांडे
या निष्काम कर्मयोगाचे तत्त्व एकदा का चित्तात स्थित झाले की, कर्तृत्वाचा अभिमान पूर्णपणे नष्ट होतो. तेव्हाच कर्म करूनही साधक भक्त अकर्माचा आनंद उपभोगू शकतो. म्हणजे काय तर, सर्व कर्मे अकर्मे होतात. फलप्राप्तीची इच्छाच निर्माण होत नाही. सत्य काय तर निष्काम कर्मयोगी साधक कर्मफलाशी संबंधित राहत नाही. त्यामुळे सुखदु:खे त्याला स्पर्शच करीत नाहीत. भगवंतांनी अशा साधक भक्तांना उद्देशून ‘योगसंसिद्ध:’ असे म्हटले आहे. म्हणजे काय तर ज्याचा हा निष्काम कर्मयोग उत्तमप्रकारे जन्मक्षणीच सिद्ध झाला आहे असा श्रेष्ठ सिद्ध पुरुष, कर्म करूनही कर्मापासून अलिप्तच राहतो. सहसा प्रत्येक मानवी जीव करीत असलेल्या प्रपंचात देहबुद्धीने अडकतो. त्यामुळे असा दुर्दैवी जीव, प्रापंचिक वृत्तीने सभोवताल अनुभवत राहतो आणि मानवी जीवनपद्धतीला घेरून बसलेल्या सुखदु:खाच्या वेगवान चक्रावर फिरत राहतो. परंतु ज्या भाग्यवान जीवाला तत्त्वज्ञानाची सोबत मिळते, तेव्हा त्याला प्रापंचिक वृत्तीने जगण्यातले फोलपण कळते आणि त्याच्या पवित्र श्रद्धेय जीवनाला खरी सुरुवात होते. प्रापंचिक जीवनपद्धतीला, मर्त्य संदर्भात घोटाळत राहण्याची सवय जडलेली असते आणि त्यामुळे असा प्रापंचिक जीव परमेश्वरी विचारापासून दूर जातो. देहबुद्धीने जगत राहायची सवय लागल्यामुळे आत्मबुद्धी लोप पावते. पावित्र्यच लोप पावते. कर्मयोगाच्या प्राप्तीने शुद्ध आणि पवित्र ज्ञानाचा आपसूक उदय होतो आणि देहबुद्धीने जगणे भस्म होऊन जाते. म्हणूनच भगवंत अर्जुनाला म्हणतात की,श्रद्धावाँल्लभते ज्ञानं तत्पर: संयतेन्द्रिय:।ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति।।