विजयराज बोधनकर
नदीचे पाणी प्यायल्यानंतर अद्याप नदी पाण्याचे पैसे मागत नाही. कारण अद्याप नदीवर मालकी हक्क सांगण्याची कुणाची हिंमत झाली नाही. पावसाने कधीच पाण्याचे बिल पाठवले नाही. कारण अजून पावसाला कुणी विकत घेऊ शकले नाही. कारण हा निसर्गस्रोत स्वार्थासाठी राबत नसून एका नि:स्वार्थी ईश्वरी व्यवस्थेचा अनंत काळापासूनचा न उलगडणारा प्रवास आहे. याच निसर्ग व्यवस्थेचा मानव एक भाग आहे. मानवजातसुद्धा एक प्रकारचे निसर्गतत्त्व आहे. परंतु ज्याप्रकारे इतर घटक नि:स्वार्थ होऊन कार्यरत आहेत त्याउलट मानव वागण्याचा प्रयत्न करतो आहे. लाखो वर्षांपासून लोभ, वासना, स्वार्थ, अधर्म, अशी अनेक दुष्कृत्यं करीत आल्यामुळे या भूमीवर पाप नावाचा एक जटिल प्रश्न उभा आहे आणि आजही तो अनुत्तरित आहे. तो प्रश्न सोडवायचा झाल्यास प्रत्येक बुद्धिवान जीवाने मानवाची दांभिक विचारधारा स्वीकारण्यापेक्षा निसर्गाची तत्त्वं अंगीकारली तर मानव अनेक संकटांतून मुक्त होऊ शकतो. पाखंडी मानवानेच मानवाला फसविण्यासाठी अनेक क्लृप्त्या शोधून काढून हजारो वर्षापासून साध्या भोळ्या समाजाला अधोगतीकडे नेणाऱ्या विचारधारेत जखडून ठेवले आहे. त्यामुळे मानवाची बौद्धिक पातळी खुंटली आहे. निसर्गाला कुठल्या गुरूची गरज लागत नाही तशी मानवालासुद्धा कुठल्या गुरूच्या मंत्राची गरज नाही. कारण शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण हे फक्त पुस्तकी शिक्षण असतं. त्याचा अनुभूतीशी काही एक संबंध नसतो. त्याउलट स्वयं शिक्षण हेच खरं शिक्षण मानवाला विकासाच्या मार्गावर नेऊ शकतं. फक्त स्वयं शिक्षणाची सवय मानवाने लावून घेतली पाहिजे. चिमणी स्वयं शिक्षणाने खोपा तयार करते. तिला त्याचे शिक्षण अंतस्फूर्तीने मिळते. म्हणजेच पुस्तकी शिक्षणापेक्षाही स्वयं शिक्षण किती विकासाच्या मार्गाने घेऊन जाऊ शकतं याची अनुभूती तिथे आल्याखेरीज राहत नाही.