स्नेहलता देशमुखअर्जुन भगवंतांना विचारतो, हे भगवंत ब्रह्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे स्वभाव. कारण स्वभावो अध्यात्म उश्वते हा शब्द अधि+ आत्मन. अधि म्हणजे त्या संबंधीचे. म्हणून अधि आत्मन म्हणजे आत्म्यासंबंधीचे ज्ञान. स्वभाव म्हणजे स्वस्वरूपाविषयीचा भाव आणि स्वस्वरूपास जाणणे म्हणजे आत्म्याला जाणणे. म्हणूनच स्वभाव म्हणजे अध्यात्म. आनंदी स्वभाव, म्हणजे आनंदरूप आहे, हे जाणतो तो आनंद स्वरूपच होतो, परंतु असेही म्हटले जाते. ‘स्वभावो दुरतिक्रम’ स्वभाव बदलता येतो का? तर उत्तर आहे, नक्कीच बदलता येतो. आपण प्रयत्न करीत राहणे हाच त्यावर उपाय आहे.
नोकरीला जाताना अडचणी आल्या, तरी त्यावर मात कशी करायची, हे मी कुलगुरू असताना माझ्या टंकलेखिकेकडून शिकले. आमचे आॅफिस चर्चगेटला. टंकलेखिका राहायची डोंबिवलीला. नेहमीच कार्यालयीन वेळ साडेदहाची. एक दिवस बारा वाजून गेले, तरी तिचा पत्ता नव्हता. मी माझ्या सेक्रेटरीला फोन करून ती येणार आहे की नाही, हे विचारण्यास सांगितले, परंतु संपर्क होऊ शकला नाही. शेवटी दोन वाजता दुपारी तिचे कार्यालयात आगमन झाले. घाबरूनच तिने माझ्या आॅफिसमध्ये प्रवेश केला आणि उशीर झाल्याबद्दल क्षमा मागितली. मी माझ्या रागावर नियंत्रण ठेवीत तिला म्हटले, ‘अगं, तू दमली असशील, तर आधी जेवून घे.’ तिचे उत्तर ऐकून मी अवाक् झाले. ती म्हणाली, ‘आम्ही सगळ्या मैत्रिणी गाडीतच भजन करीत प्रार्थना करीत होतो आणि उपास म्हणून फक्त दोन केळी खाल्ली. पुन्हा एकदा विठ्ठलाचे भजन केले. तासाभराने गाडीला सिग्नल मिळाला, आम्ही सगळ्यांनी देवाचे उपकार मानले आणि आॅफिसला आलो. आता तीन तास मी जास्त काम करून भरून काढीन. तुमची गैरसोय होऊ देणार नाही.’ खरंच, ही वृत्ती म्हणजेच आध्यात्मिक वृत्ती. श्रद्धा, संयम, सुविचार यांची सांगड घालून आपले जीवन समृद्ध करणे म्हणजे अध्यात्म जगणे.