प्रा. शिवाजीराव भुकेलेपरमार्थ हा कृतीचा, कर्माचा, योगाचा, ज्ञानाचा, कर्मकांडाचा, भक्तीचा की विचाराचा असावा, या बाबतीत कथा-कीर्तनाचे फड उभे करणाऱ्या मंडळींमध्येच एकमत झालेले नाही. यातील अनेकांची अवस्था ‘हत्ती’ पाहायला गेलेल्या सहा आंधळ्यांसारखी झाली आहे. ज्याच्या हाती जे लागते, तो तेच अंतिम सत्य म्हणून प्रतिपादन करू लागला आहे. या साºया गदारोळावर एकच उत्तर आहे, ते म्हणजे परमार्थ. हा विचाराचा असावा आणि विचारनिर्मितीचे ऊर्जाकेंद्रे संताच्या वाङ्मय मूर्ती अर्थात ग्रंथ आहेत. नदीच्या विस्तारापेक्षा तिच्या खोलीला महत्त्व आहे. आतून ‘तळ’ उथळ होऊन नदी विस्तारत गेली की, पहिल्याच महापुरात गावागावांत शिरून गावकऱ्यांना जीवन नकोसे करते. या निसर्ग नियमाप्रमाणेच परमार्थाचा एक नियम आहे, ज्याच्या परमार्थ मार्गास वैचारिक अधिष्ठान नाही, तो आपल्यासहीत इतरांचे जीवन दु:खी करतो. याउलट वैचारिक अधिष्ठान प्राप्त झालेला परमार्थिक ‘सर्वसुखी’ समाजाची संकल्पना सत्यात उतरण्यासाठी धडपडतो आणि वैचारिक अधिष्ठान निर्माण करणारी निष्काम माउली म्हणजे ग्रंथ होत. ज्यांचे वर्णन करताना ज्ञानेश्वर माउली म्हणते,अहिता पासून काठीती। हित देऊन वाढविती।नाही गा श्रृति परौती। माउली जगा।
माणसाला शेकडो आपत्तीपासून वाचवून त्याची इष्टापत्तीकडे वाटचाल व्हावी, म्हणून प्रामाणिकपणे प्रयत्न करणारी श्रृती माउली म्हणजे ग्रंथ होत. ग्रंथाचे वाचन मनातील स्वस्वरूपाच्या अंधाराला नष्ट करून त्याला उजेडाची स्वप्ने दाखवितात. म्हणून माणसाच्या माणुसकीची व पारमार्थिक विचारांची आणि सामाजिक विचारांची उंची त्याच्या धन संचयातून आणि धनातून मिळणाºया मानातून समजत नाही, तर त्यांच्या ग्रंथ संपदेवरून व ग्रंथवाचनावरून समजते. पुस्तके-मस्तके समृद्ध करतात, हे वाक्य आपण वारंवार ऐकत आलो आहोत, पण ते मस्तकातच घुसायला तयार नाहीत. कारण आज अनेक उच्चशिक्षित मंडळींनीच वाचन संस्कृती आणि ग्रंथोपजिवीचे समाज निर्मितीचा पराभव केला आहे. परमार्थाच्या क्षेत्रात तर ग्रंथवाचनातून ‘विवेकाची कास’ धरण्यापेक्षा नमस्कार, चमत्कार, जारण, मारण, वशीटन, ऋद्धी, सिद्धी इ. बाह्य सोंगा-ढोंगांना खूपच महत्त्व दिले जात आहे. म्हणून मस्तकावर कुठल्याही धर्म पंथाचा टिळा नसला तरी चालेल, पण मस्तकाच्या आत त्या धर्म सांप्रदायाने निर्माण केलेला सुविचार असला पाहिजे आणि या सुविचाराची पेरणी उत्तमोत्तम, ग्रंथाचे ‘वाचनच’ निर्माण करू शकते.
ग्रंथ जगण्याला अर्थ देतात. आत्म्याचे भान जागे करतात अन् निद्रिस्त समाज जीवनास खडबडून जागे करतात, म्हणून ज्ञानदेव कळायचे असतील, तर ज्ञानेश्वरी कळावी लागेल, तुकोबा कळायचे असतील, तर ‘गाथा’ कळावी लागेल अन् कृष्ण कळायचे असतील, तर ‘गीता’ कळावी लागेल व अस्था ग्रंथोपजीवी समाजासच ग्रंथ दृश्य व अदृश्य फळ देतात, ज्याचे वर्णन करताना ज्ञानदेव माउली म्हणतात,आणि ग्रंथेपजीविये । विशेषे लोकी इये।दृष्टा-दृष्टविजयें। होआवें जी।।