प्रा. शिवाजीराव भुकेले
मानवी जीवनातील मानवता वादाचा आणि परमार्थाच्या वाटेवरील ज्ञानदीपाचा अस्त करू पाहणारे भुजंग म्हणजे काम, क्रोध हे होत. समाजजीवनास निरामय, सात्त्विक आनंद प्राप्त व्हावा म्हणून संतांनी समाजास विकारमुक्त करून विचारशीलतेची शिकवण दिली. विकार हे समाज जीवनात वाढणारे अनावश्यक तण आहे, जर शेतात पीक छोटे व तण मोठे असेल तर शेती कसणारा अपरिपक्व समजावा. शरीर नावाच्या शेतात काम, क्रोधाचे तण नको तेवढे माजले असेल आणि वर केवळ परमार्थाच्या गप्पा मारल्या जात असतील तर तो साधक अपरिपक्व समजावा. सामाजिक जीवनात सामाजिक सौहार्द भावनेचे पीक तरारून यावे असे वाटत असेल तर समाज जीवनास दिशा दाखविणाऱ्या मंडळींना आपल्यामधील व समाजामधील क्रोध नावाचे ‘तण’ कापून काढलेच पाहिजे. क्रोध नावाचा विकार साधकाच्या मनातील सृष्ट शक्तीचे दुष्ट शक्तीत जेव्हा रूपांतर करतो तेव्हा माणसासकट वसत्या जाळल्या जातात. केवळ आपण म्हणतो तीच पूर्व दिशा हे दुराग्रही क्रोधायमान मत जर दुसºयाने ऐकले नाही तर माणसाच्या रक्ताचीच रंगपंचमी खेळली जाते.
वैयक्तिक क्रोध भावनेमुळे अनेक ऋषीमुनींपासून ते तत्कालीन समाजाला दिशाहीन करण्याचे काम केले, पण दुसºया बाजूला आपल्या साºया शरीरात खिळे ठोकणाºयाला माफ करणाºया ख्रिस्तांनी क्रोधाला जिंकले. बंधुत्वाची शिकवण देणारे पैगंबर, हिंसेला आपल्या अहिंसक विचाराने जिंकणारे महावीर, कारुण्याने ओथंबलेल्या समाजनिर्मितीचे स्वप्न रंगविणारे बुद्ध, तर मध्ययुगीन कालखंडात भूता परस्परे जडो मैत्र जिवांचे ही भावना व्यक्त करणारे ज्ञानेश्वर माउली, मातेस प्रार्थना करणारे तुकोबाराय हे आजच्या समाजजीवनाचे आदर्श ठरले तरच समाजातून काम-क्रोध हद्दपार होतील.