शैलजा शेवडे
रोम रोमी झंकार उठे तो, नाद घुमे श्रीराम,काया ही जाहली अयोध्या, जयघोष तो श्रीराम।उल्हास आगळा, हर्ष आगळा, सोहळाच श्रीराम,स्वप्नपूर्तीचे क्षण हे आले, उत्सुकता श्रीराम।प्रतीक्षेची गोडी आगळी, लहर लहर श्रीराम,स्वागतात्सव रांगोळीही, रंगरेघ श्रीराम।एक नवी सुरु वात सुंदर, पहाटही श्रीराम,नवीन किरणे भाट जाहली, गाताती श्रीराम।पणत्या ही त्या प्रभूनामाच्या, लावियल्या श्रीराम,ज्योतिर्मय होऊनी येतील, आता आत्माराम।
केवळ सुंदर प्रतीक्षा. कधी येतील श्रीराम? ही विरहव्याकूळ वेदनाही अतीव सुंदर आहे. कारण खात्री आहे श्रीराम प्रकटणार आहेत. हे शरीर जणू अयोध्यानगरी झाले आहे. रामजपाने भूमिपूजन झाले आहे. साधना झाली आहे. जणू मंदिर तयार झाले आहे. मूर्तिस्थापना झाली आहे. प्राणप्रतिष्ठा बाकी आहे. या शरीराचा कणकण आतुर झाला आहे. खरंच, कधी होईल आत्मारामाचा साक्षात्कार? एकदा का आत्माराम प्रकटला की, रामराज्य येईल. राम म्हणजे सच्चिदानंद. बोलण्यात, लिहिण्यात, कृतीत राम येईल. आनंद येईल. हृदयात आनंद. तर मग वाईट विचार, दुष्ट विचार येणे शक्यच नाही. राम म्हणजे प्रकाश! जीवनातील अंधार दूर करणारा प्रकाश. एकदा आत्माराम प्रकटला की, सगळा अंधार, भीती, चिंता दूर होईल. भवाचे भय दूर होईल. वर्तमानातील चिंता, भविष्याची काळजी या सगळ्या अवघड परिस्थितीत कसं होणार, कसं राहणार आपण, ही भीती दूर होईल. भय निघून जाईल. आत्मविश्वास कमालीचा बळावेल. एकदा मनात ही खात्री आली,
ना कोरोनाचे भय राहणार, ना मृत्यूचे भय राहणार!
तुझ्यातही राम, माझ्यातही राम. जिवाजिवातील मैत्र वाढणार. सिद्वचार वाढणार!संकल्प आगळा पेशी पेशीतून, एकच हा श्रीराम,राममय व्हावी ही काया, आर्तता श्रीराम.....!