विजयराज बोधनकर
खूप आहेत प्रश्न त्याचे उत्तर कुठे आहे का? चित्रातील देव अन् मूर्तीतील देव घडविले कुणी, सजविले कुणी? कुठून झाली देवांची उत्पत्ती, कोण आहे साक्षी, उद्देश काय देवांचा. कार्य काय त्याचं, काय देतो देव, का बसला मंदिरात? निर्जीवातील सजीव की दगडातही असतो देव, अंतराळ अनंताची कथा, त्याचा देव सर्वेसर्वा, मग मिणमिणणाऱ्या दिव्याजवळ छोट्या गाभाºयात का बसविला लोकांनी? देव म्हणजे साक्षात्कार, चमत्कार की साधना. देव आहे योग की कर्माचा प्रयोग, देव कर्मकांडाचा भुकेला की कर्मदानाचा भुकेला, देव आहे प्रश्नपत्रिका की देव आनंदाची उत्तरपत्रिका? देव दिसत नाही कुठेच माणसांसारखा हाडामासाचा. कुठे आहे त्याचे अस्तित्व, त्याच्या घराचा पत्ता, त्याच्या अनेक कुलपांची चावी? देव एक गुढ महाकाव्य की गुपितांचे भांडार? देव पावतो नेमक्या कुठल्या पूजेने? कर्मपूजेने, ज्ञानपूजेने की कर्मकांडाने? आणि भक्तीने देव पावतो तर आज ही जीवघेणी गरिबी का आहे टिकून? ज्याला प्राप्त झालीय श्रीमंत त्याला कारणीभूत देवाचा आशीर्वाद की त्याच्या कर्माची मेहनत? भावभावनांची भक्ती श्रेष्ठ की भावनात्मक कर्म श्रेष्ठ? देव फक्त सजविलेलं सौंदर्य की जगण्याचं सौंदर्य सांगणारं विद्यालय? अडचणी का येतात? मग अडचणीमुळे दु:ख की दु:खातून येतात अडचणी, देव विचारांची शक्ती की तो देणार काही म्हणून करायची भक्ती? देव म्हणजे मिळविण्याची युक्ती की मनामध्ये पोसलेली देवाची भीती? तन, मन, धन यापैकी देव नेमकं काय देतो? देव का अडवू शकत नाही मृत्यूला? का बरा करू शकत नाही औषधाशिवाय आजार? या गुपीत शक्तीचं काहीतरी सांगणं आहे. ते ऐकू येत असेल तर उत्तरातलं सौंदर्य तुम्हाला शोधावं लागणार आहे.