शैलजा शेवडे
ॐ रां रामाय नम: । ॐ रां रामाय नम: ।बोल बोल रे मना, राम मंत्र बोल मना,राम नाम सुंदर हे, राम राम बोल मना ।राम असे रक्षक तो, भय का मग धरसी मना,संन्नीध तो राम सदा, बाळग ही खात्री मना ।धाक घालू दे खुशाल, पुन्हा पुन्हा महाकाळचापबाणी तो समर्थ, परतविण्या, त्यास मना ।
खरोखर मनात दृढ अशी श्रद्धा ठेवली, तर भीतीचे कारणच राहात नाही. नामस्मरण करता करता परब्रह्म स्थूल रूपाने डोळ्यासमोर येते, दशरथी रामाच्या रूपाने. तो कोदंडधारी राम. जानकीवल्लभ राम. मर्यादापुरुषोत्तम राम. धर्मविजयी राम. पराक्रमी राम. प्रजावत्सल राम. आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श मित्र, आदर्शांचा आदर्श राम! नामस्मरण करता करता विरक्ती येते. शरणागती येते. पराभक्ती निर्माण होते. सगुणोपासना करता करता पराभक्ती. म्हणजे निर्गुण ब्रह्माची प्राप्ती होते. ब्रह्मरूप रामाची तीन निवासस्थाने आहेत. अयोध्या, रामनाम आणि संतहृदय. परात्पर ब्रह्म रामाची अयोध्या ही जन्मभूमी आहे. अयोध्यावासाने जीवनमुक्ती लाभते अशी श्रद्धा आहे. शरयू, मिथिला, चित्रकूट हीसुद्धा पवित्र स्थाने आहेत. सगुणाची आराधना करता करता रामाच्या विराट रूपाची जाणीव होते. त्याचा स्थूल देह म्हणजेच ब्रह्मांड. नद्या, पर्वत, वृक्ष, वनस्पती, नक्षत्रे... सर्व त्या परब्रह्म रामाचे विराट स्वरूप. सगळीकडे राम आहे ही जाणीव होताच प्रेमरस दाटून येतो. अंगावर रोमांच उठतात. इकडे-तिकडे रामच राम! किती सुंदर आहे ही जाणीव. रामाचे सूक्ष्म रूप ध्यानाचा विषय आहे. श्रीराम देवतांचे हृदय आणि परम गुह्य तत्त्व आहे. वेदांनी प्रतिपादन केलेले अविनाशी ब्रह्म रामच आहे. अर्थात ही जाणीव व्हायला साधना करायला हवी. काया, वाचा, मने आचरण्याची जी शुद्धता, ती शुद्ध उपासना. रामोपासना म्हणजे रामाचे सर्व आदर्श आयुष्यात उतरविण्याची उपासना. अशी उपासना करता करताच सर्वांठायी परमेश्वर दिसू लागतो.