- डॉ. रामचंद्र देखणे- कोणत्याही धर्माच्या, देशाच्या, संस्कृतीच्या आणि अध्यात्मिक विचारांच्या प्रणालीमध्ये सर्वांनीच ‘भक्ती’ या संकल्पनेला खूप मोठे स्थान दिले आहे. भक्तीच्या अर्थाविषयी, स्वरूपाविषयी साक्षात्कारी संत, महात्मे, तत्त्ववेत्ते यांनी काही प्रमाणात विभिन्न मते मांडली असली तरी त्या सर्वांनी भक्ती ही प्रेमभावाची अत्युच्च अनुभूती आहे हे मान्य केले आहे. काहींनी भक्तीला शास्त्र म्हटले आहे. म्हणून भक्तीशास्त्र हा शब्द रूढ झाला आहे. तर भक्ती ही भावनिक पातळीवर आणि देव व भक्त यातील भावदर्शनाने जोडलेली असल्याने भावदर्शन हे शास्त्र कसे होईल? अशीही शंका व्यक्त केली आहे. भक्तीसाठी द्वैताची आवश्यकता आहे. कारण भक्त वेगळा आणि परमात्मा वेगळा आहे. ज्ञानियांचे ज्ञेय ध्यानियांचे ध्येय तपस्वियांचे तप, जपकांचे जाप्य आणि योगियांचे गौप्य हे एकमेकांपासून वेगळेच आहे ना. ज्ञानवंताला ज्ञेय हवे असेल तर भक्ताला त्याचे प्रेम हवे आहे. भक्तीच्या माध्यमातून संतांनी किंवा खूप मोठ्या समत्वतेचे दर्शन घडविले आहे. ज्ञानाची अवस्था घेतली तर प्रचंड मोठा ज्ञानी आणि साधारण ज्ञानी असा भेद होऊ शकेल; पण एखादा भक्त हा खूप मोठा आणि एखादा खूप लहान असे कधीच नसते. भक्तीच्या पातळीवर तो सम असतो आणि तो भक्तच असतो. अर्जुन हा श्रीकृष्णाचा भक्त होता. तो राजघराण्यातील होता तर सुदाम हादेखील श्रीकृष्णाचा भक्त होता आणि तो मात्र सामान्य आणि दरिद्री होता. श्रीकृष्णाने भक्त म्हणून अर्जुनाला जेवढे स्वीकारले तेवढेच सुदाम्यालाही. भक्तीने सर्वांना समान अधिकार प्राप्त होतो. तुकोबारायांनी म्हटल्याप्रमाणे, ‘सकलासी येथे आहे अधिकार’ किंवा ‘पै भक्ती एकी मी जाणे। तेच साने थोर न म्हणे। आम्ही भावाचे पाहुणे। भलतेया।।’ ज्ञानेश्वरी ही संतांची वचने पाहिल्यावर भगवत प्रेमाच्या अनुभूतीवर सर्व भक्त भगवंताला सारखेच प्रिय आहेत. भक्तीने एकीकडे विश्वव्यापी अनादि परमात्मा मिळवायचा आहे तर दुसरीकडे माणसामाणसातला देव शोधायचा आहे. भक्त प्रत्येक भूतमायात देवच पाहतो आणि साम्यभावाचे दर्शन घडवितो. अभेदाचे मानवी दर्शन म्हणजे भक्ती होय. ‘जे जे भेटे भूत। ते ते मानिजे भगवंत’ हा ज्ञानदेवांचा समत्वदर्शी भक्तीयोग आहे आणि तोच सकल संतांच्या भक्तीदर्शनाचा पाया आहे.
आनंद तरंग- भक्ती अभेदाचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 4:29 PM
ज्ञानाची अवस्था घेतली तर प्रचंड मोठा ज्ञानी आणि साधारण ज्ञानी असा भेद होऊ शकेल; पण एखादा भक्त हा खूप मोठा आणि एखादा खूप लहान असे कधीच नसते.
ठळक मुद्देभगवत प्रेमाच्या अनुभूतीवर सर्व भक्त भगवंताला सारखेच प्रियसमत्वदर्शी भक्तीयोग सकल संतांच्या भक्तीदर्शनाचा पाया