डॉ. मेहरा श्रीखंडे
कुंडलिनी किंवा सप्तअग्नी ही प्राणमय कोषात मूलाधार चक्रात कोंडलेली असते. ती जेव्हा उद्दिपीत होते तेव्हा राहिलेल्या सहा चक्रांना, दैवी व अवकाशीय शरीरांना गतिमान करते. गूढवादी ती जेव्हा उद्दिपीत होते तेव्हा प्रवाहीत अग्नीच्या रूपात शरीरात खेळत असलेली बघतात व एखाद्या सापाच्या वेटोळ्याप्रमाणे नागमोडी फिरताना बघतात. तिच्यामध्ये प्रचंड शक्ती असून एकदा उद्दिपीत झाल्यावर सातही चक्रांना गतिमान करते. ही कुंडलिनी सात प्रकारच्या शक्तींनी बनलेली असते व ती उद्दिपीत झाल्यावर या सातही चक्रांमध्ये दैवी शक्तीचा प्रभाव टाकत जाते. ज्या माणसात दैवी गुण पूर्णपणे विकसित झालेले असतात त्याला सभोवतालचे ३६0 अंशातले सर्वकाही दिसू शकते. ज्याप्रमाणे आपल्या भौतिक शरीराला नेहमी प्रकाश, आवाज, उष्णता व थंडी यांच्यातील संवेदना जाणवू शकते, त्याचप्रमाणे उद्दिपीत झालेल्या दैवी शरीराला दैवी जगातील अनुभव येऊ लागतात. मृत्यूनंतर प्राणमय कोष हा त्या शरीराभोवती काही तास अथवा दिवस फिरत असतो व गूढवाद्यांना तो एका धूसर जांभळ्या ढगाच्या रूपात दिसतो. ही प्राणमय भुते अनेक तुटत असणाऱ्या अवस्थेत असून नवीन केलेल्या थडग्यांभोवतीही फिरताना आढळतात. ह्याचवेळी हे दैवी शरीर व त्याचे उच्च घटक या प्राणमय कोषातून स्वत:ला वेगळे करतात व त्यांच्या त्यांच्या मार्गाला लागतात. काही गूढवादी गाडण्यापेक्षा जाळण्याच्या प्रक्रियेला अधिक प्राधान्य देतात. कारण त्यामुळे प्राणमय कोष व भौतिक शरीरातही तुटण्याची क्रिया जलदगतीने होते. जे लोक जीवनाबद्दल जास्त आसक्त असतात, त्यांच्या बाबतीत हे व्हायला वेळ लागतो.