नीता ब्रह्माकुमारी‘अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावरआधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर ’अन्न, वस्त्र, निवारा या मनुष्याच्या मूलभूत गरजा. आज त्या पूर्ण करण्यासाठी मनुष्य सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कष्ट सोसत आहे. सांसारिक जीवनात इतके व्यस्त झाले आहोत की, स्वत:साठी वेळ काढणेही मुश्कील; पण जो खटाटोप केला जात आहे, खरंच त्याने आपले जीवन समाधानी आहे? लहानपणी खेचाखेचीचा खेळ खेळायचो. एका व्यक्तीला दोन्ही बाजूंनी खेचले जायचे; पण आज फक्त दोनच नव्हे, तर चारही दिशेने खेचले जात आहोत. यात तन आणि मन दोघांचीही झीज होत राहते. जीवनाचा आनंद घेणे तर दूरच; पण आज हे ओझं बनले आहे. जगण्याचा आनंद घ्यायचा असेल तर कमळासारखे राहायला शिकायला हवे. कमळाचे फूल पाण्यावर एकटे दिसत असले तरी त्याचा भला मोठा संसार पाण्याखाली असतो. या संसारात खूप गुंतागुंत असली तरीही आपले सौंदर्य जपणारे हे कमळ फूल. आयुष्यात अनेकानेक व्यक्ती, प्रसंग, साधने येऊन गेली. त्यांच्याबरोबर राहताना, साधनांचा वापर करताना त्याच्यापासून अलिप्त राहण्याची कला ज्याने आत्मसात केली, तोच खरा गुणवान. म्हणूनच देवी- देवतांच्या प्रत्येक अंगाचे पूजन केले जाते. तसेच त्यांच्या पवित्र अंगांना कमळपुष्प समान मानले जाते. जसे हस्तकमळ, नाभीकमळ, मुखकमळ, पद्मकमळ... पण आज या देवतांच्या प्रतिमा फक्त दर्शनासाठीच राहिल्या आहेत. त्यांच्या रूपाद्वारे जे गुण आत्मसात करायला हवेत त्याकडे मात्र आपले लक्ष नाही. आज मनुष्य जे काही करतो त्याचे फळ प्राप्त करण्याची वृत्तीसुद्धा बाळगतो; पण ‘नेकी कर दर्या में डाल’ फळाची अपेक्षाही न ठेवता कर्म करण्याची प्रेरणा ‘गीता’ शास्त्रामध्ये वर्णली आहे. सर्व काही करून अनासक्त वृत्ती ठेवावी. याचेच प्रतीक कमळ हे आहे. म्हणूनच आपण आपले जीवन दलदलीतील कमळपुष्पासारखे जगावे.
आनंद तरंग: कमलपुष्पसम जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2020 12:54 AM