- डॉ. रामचंद्र देखणे-
पुंडलिकाच्या भेटीसाठी पांडुरंग हा परमात्मा पंढरपुरी आला आणि भक्तिसुखात रंगून गेला. असे पंढरीचे महात्म्य आहे. ढगांमध्ये काळा ढग सुंदर वाटतो. लोकांना तो सतत छाया देत असतो. लोकांना देण्यासाठी भरून आणलेल्या जलामुळे त्याची कांती सावळी झालेली असते. दातृत्वाची सुंदरता त्यात झळाळत असते. पांडुरंगाची कांती अशीच सावळी आहे. ही नयनमनोहर सावळी कांती पाहून संत सुखावले आणि त्याच्या स्वरूपदर्शनात स्वत:लाच हरपून बसले. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणू लागले, ज्ञानदेवी निळा । परब्रह्मी गोविला । कृष्णमूर्ति सावळा । हृदयी वसे ।। भगवान विष्णूच्या प्रेमळपणातून निर्माण झालेला काळेपणा आणि भगवान शंकराच्या स्थितप्रज्ञेतून निर्माण झालेली शुभ्रता. या काळेपणाचे आणि शुभ्रतेचे मिश्रण म्हणजे पांडुरंग. प्रेमाची कृष्ण छटा आणि ज्ञानाची शुक्ल छटा म्हणजे ज्ञान आणि प्रेम यांच्या एकवटण्याने जो रंग उभा राहतो ती पांडुरंगाची कांती होय. पांडुरंग म्हणजे-ज्याचा रंग पांडू आहे तो. पांडू म्हणजे स्वच्छ, सृष्टीमध्ये भोगाचा एक वेगळा रंग आहे. पण भक्तीपुढे त्याला चकाकी नाही. भक्तीचा रंग स्वच्छ आहे. तो धारण करणारा पांडुरंग आपल्या भक्तांनाही स्वच्छ जीवनकांती देण्यासाठी उभा आहे. भक्तीच्या, विवेकाच्या आणि सदाचाराच्या रंगाने जीवनाची स्वच्छ सुंदर कांती निर्माण करायची आहे. अशी कांती असणारा पांडुरंग सौंदयार्चा गाभा आहे. ही कांती पाहून ज्ञानेश्वर माऊली हरखून गेले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली म्हणू लागले, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती । रत्नकीळ फाकती प्रभा ।। विठ्ठलमूर्ती-राजस सुकुमारह्ण श्रीविठ्ठल हे महाराष्ट्राचे लोकदैवत आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींपासून निळोबारायांपर्यंत सर्व संतांनी त्यांच्या गुणचिंतनात जीवनाची कृतार्थता अनुभवली आहे. भक्तीच्या सुखाने लाचावलेला आणि गोकुळी गोपवेशाने गाई राखणारा तो कृष्णच पुंडलिकासाठी भीवरेच्या तीरी विसावला. पंढरपूर हे सकळ तीथार्चे आणि साऱ्या मंगलाचे माहेर आहे. भक्तीसुखे लाचावला । जाऊ नेदी उभा केला ।। निवृत्तिदास म्हणे विठ्ठला । जन्मोजन्मी न विसंबे ।।पुंडलिकाच्या भेटीसाठी हा परमात्मा पंढरपुरी आला आणि भक्तिसुखात रंगून गेला. भक्तीसुखे लाचावला, जाऊ नेदी उभा केला, असे निवृत्तिदास म्हणतात.