- विजयराज बोधनकरअध्यात्मातील दुसरी कला आहे उत्तम ऐकण्याची म्हणजेच श्रवण कला. आपण ऐकतो म्हणजे फक्त ऐकणे असे नसून आपण कुठल्या हेतूने ऐकतो नि त्याचे महत्त्व समजून ऐकतो का, यावर ते अवलंबून असते. समजा उत्तम वक्त्याचे भाषण सुरू आहे आणि आपल्या मनात त्याच वेळी भलतेच विचार सुरू आहेत, अशा वेळी महत्त्वाच्या माहितीचा स्रोत आपण गमावून बसत असतो आणि त्यामुळेच आपली अज्ञानाची पोकळी कधीच भरून निघत नसते. ऐकणे, ते स्मृतिकोषात साठवणे, त्यावर चिंतन, मनन करणे आणि योग्य वेळी त्या माहितीचा उपयोग करणे हेच उत्तम ऐकण्याचे फलित असते. एका शब्दाचे, वाक्याचे, कथेचे अनेक अर्थ निघू शकतात, आपण जे ऐकतो व त्याचे नेमके अर्थ लावता आल्यामुळेच आपण ज्ञान परिघाच्या आत सुरक्षित राहतो. कुठलीही गोष्ट समजून घेऊन ऐकली पाहिजे, मग ते शाळा-कॉलेजमधील लेक्चर असो वा सत्संग, प्रवचन, कीर्तन, बातम्या, व्याख्यानमालेतले विचार, महत्त्वाच्या विषयावरच्या चर्चा, अवांतर चर्चा, घरातील नियोजन, दिग्गज व्यक्तींच्या मुलाखतीतील विचार, आशयगर्भ गीते, कवी संमेलनातील कविता असो, अशा अनेक गोष्टी आपण चिंतन आणि मननाच्या स्तरावर ऐकून आणि त्याचा उपयोग करून घेता आलाच पहिजे. आणि हेच ऐकताना प्रत्येकाने तपासून पाहिलेच पाहिजे, अन्यथा भरपूर खाल्ले पण पचले नाही, अशी अवस्था झाल्यास त्याचा शून्य उपयोग होऊन फक्त वेळ वाया घालवणे असे होऊ शकते. अनेकांना दहा-पंधरा वर्षांपूर्वी ऐकलेले विचार आठवतात. अशी माणसे लेखक, वक्ता, उत्तम निवेदक, सल्लागार, राजकारणी, उद्योगपती, महत्त्वाच्या पदावरच्या व्यक्ती बनलेल्या असतात. याचे मूळ कारण म्हणजे त्यांच्या स्मृतिशक्तीचा संचय हा आत्मविश्वासाने भरलेला असतो. म्हणूनच अशांना उत्तम श्रोता म्हणतात. भविष्य घडविण्यासाठी श्रवणकला ही महत्त्वाची भूमिका बजावत असते.
कुठलीही गोष्ट समजून घेऊन ऐकली पाहिजे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 5:19 AM