- डॉ. दत्ता कोहिनकर- हेकेखोर स्वभाव व जुळवून घेणे जमत नसल्याने केदार कुठल्याही नोकरीत स्थिर होत नव्हता. सासर्यांच्या ओळखीने त्याला नामांकित कारखान्यात नोकरी लागली होती. ती पण त्याला टिकवता आली नाही. या गोष्टींचा त्याच्या मनावर परिणाम होऊन तो नैराश्यात गेला. तीव्रता इतकी वाढली कि तो आक्रमक (तेळश्रशपीं) होऊन घरात वस्तू फेकणे, मारहाण करणे इथपर्यंत त्याची मजल गेली. त्याची पत्नी नीता हिने आई-वडिलांच्या मदतीने केदारला समुपदेशक मानसोपचार तज्ञांकडे नेले. सहा महिन्यांची रजा काढून केदारला गोळया देणे, भोजन, प्रेम, आधार, सहानुभूती बहाल करणे याला तिने विशेष प्राधान्य दिले. संपूर्ण, लक्ष्य केदारकडे देऊन त्याला नैराश्यातून बाहेर काढण्यात नीताला यश आले. त्याचा वेळ जावा (मोकळं मन सैतानाचं घर) व आत्मविश्वास वाढावा म्हणून एका ओळखीच्या फर्म मालकाकडे नीताने केदारला कामावर ठेवून स्वतःच्या पर्समधून 20,000/- मासिक पगार - फर्म मालकातर्फे केदारला दयावयास लावला. केदार पूर्णतः बरा झाला. आज एका नामांकित कारखान्यात तो पाच आकडी पगार घेत आहे. नीताने केदारशी पूर्णतः स्वतःला जुळवून घेतलं म्हणून आज केदार व नीताचा संसार उभा राहिला. खरोखर मित्रांनो ज्याला जुळवून घेता आलं त्याला सुखी जीवनाचं रहस्य उमगलं. विवेकानंद प्रार्थना करताना म्हणतात, हे ईश्वरा, या जगात मी जे बदलू शकतो ते बदलण्याची ताकद दे, जे मी बदलू शकत नाही. त्याच्याबरोबर जुळवून घेण्याची कुवत मला दे व मी काय बदलू शकतो व काय बदलू शकत नाही हे समजण्याचं शहाणपण मला दे. कुठं जुळवून घ्यायचं व काय बदलायचं हे समजण्यासाठी प्रज्ञेची कास विकसित केली पाहिजे. माणसाच्या आयुष्यात चढ-उतार असतातच, बॅडपॅच असतात. त्यावेळेस त्याला परिस्थितीशी जुळवून घेता आलं पाहिजे. जुळवून घेणे ही एक कला आहे. जुळवून घेण्यास असमर्थ ठरणे हे मानसिक दौर्बल्य आहे. हे दौर्बल्य दूर करण्यासाठी मनाच्या सबलतेची व निर्मलतेची गरज असते. त्याकडे दुर्लक्ष केले तर ही माणसे मानसिक आजारांना बळी पडतात. आपण मुलांना पाहिजे ते त्वरित पुरवले तर लोकांशी व परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या त्यांच्या मानसिकतेत आपण अडथळा आणत असतो. मुलांना शाळेत जुळवून घेता आले नाही तर त्यांना शाळेची भिती वाटू लागते. अभ्यासाशी जुळवून घेता आलं नाही तर न्यूनगंड वाढतो. घरच्यांशी जुळवून घेता आलं नाही कि नात्यात दरी वाढते. अशी मुले पुढं जाऊन सर्वच स्तरावर जुळवून घेण्यास असमर्थ ठरतात. मग त्यांना आयुष्य एक ओझं वाटू लागते. मीच का जुळवून घेऊ ? मीच का तडजोड करू ? अशा विचारांनी ही माणसे समाजातून दूर फेकल्यामुळे एकटी पडतात व नैराश्यात जातात. केदारला देखील लोकांशी जुळवून घेणे जमत नव्हते. त्यामुळे लोकांशी त्याचा सारखा वाद व्हायचा व हेकेखोर - भांडकुदळया स्वभावामुळे वरिष्ठांपर्यंत त्याच्याबदद्लच्या तकह्यारी जायच्या. शेवटी त्याची नोकरी जायची. नीताने मात्र परिस्थितीशी जुळवून घेतले व परिस्थिती बदलण्यासाठी योग्य दिशेने संयम, चिकाटी, धीर न सोडता यथोचित प्रयत्न केले. औषध, गोळया, प्रेम, समुपदेशन, मानसिक आधार यांसारख्या अनेक मार्गाचा तिने केदारसाठी वापर केला. केदारची मानसिक स्थिती सुधारल्यावर त्याच्या स्वभावात बदल घडवण्यासाठी नीता-केदारला बरोबर घेऊन विपश्यनेच्या 10 दिवसीय निवासी शिबिरात दाखल झाली. ध्यानाच्या दैनंदिन सरावानंतर केदार जुळवून घ्यायला व संयम राखायला शिकला. आज 5 आकडी पगाराची नोकरी त्याची कायमस्वरूपी झाली आहे व त्याचा संसार सुखाने चालला आहे. मित्रांनो..! जीवनात प्रत्येक गोष्ट ही बदलणारी आहे. सुख आले तरी नाचू नका, दुःख आले तरी रडू नका. सुखदुःखात परिस्थितीशी जुळवून आनंदी रहा व जुळवून घेण्याची कला दैनंदिन जीवनात उतरवा. तुमच्या जीवनवेलीवर आनंदाची - सुवासिक फुले दरवळायला लागतील. म्हणतात ना - दोन घडीचा डाव - याला जीवन एैसे नाव ।
जुळवून घेण्याची कला दैनंदिन जीवनात उतरवा...!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 7:48 PM