ॐ ईशावास्यमिदम सर्वं यत्किंच जगत्यां जगत । तेनत्येक्तेन भुञ्जीथा मा गृध: कस्य स्विद्धनम ॥ १ ।। ईशावास्योपनिषदातील हा पहिलाच मंत्र आहे. मानवी जीवन सुखकर कसे होईल, हे या मंत्रात फारच छान सांगितलेले आहे. ईशावास्योपनिषद हे शुक्ल यजुवेर्दीय शाखेतील उपनिषद आहे. या उपनिषदात कुठलीही कथा नाही, पण जीवनाचे सारतत्त्व यात सांगितले आहे. हे जड चेतन जगत जे आहे. ते सर्व ईश्वराने व्याप्त आहे. परमात्मा सर्वत्र भरून राहिलेला आहे. ‘एकोहं बहुस्याम प्रजायेय।’ मी एकटाच. अनेक व्हावे हा ईश्वराचा सृष्टीच्या आरंभीचा संकल्प व त्यानुरूप तोच सर्वत्र नटलेला आहे. ‘यो वै भूमा तत्सुखं , नाल्पे सुखामस्ति ।।’ भूमा म्हणजे व्यापक . देव, ब्रहम. परमात्मा हे एकार्थवाची शब्द आहेत. तोच सर्वत्र आहे, हा सिद्धांत वेदाला सांगायचा आहे. मानवी जीवन कसे चांगले जगता येईल, हे महत्वाचे आहे. त्यासाठी जगात सर्व वस्तू परमेश्वराने निर्माण केल्या आहेत. परंतु हे जगत् नश्वर आहे हे ही लक्षात असले पाहिजे. वरील मंत्रात सांगितले आहे की, हे जगत् ईश्वराने व्याप्त आहे व तू जगातील सर्व वस्तूंचा भोग अवश्य घे. पण धन हे शाश्वत नाही, हे लक्षात ठेवायचे. म्हणजे तू या सुखांचा भोग जरूर घे. पण अलिप्ततेने घे. त्याच्याशी तादात्म्य ठेवू नको. वस्तू, सुख-दु:खाला कारणीभूत नसून त्या वास्तूविषयी असलेले तादात्म्य कारण आहे. एखादी वस्तू आपली नसून आपली मानने म्हणजेच तादात्म्यता होय.
भारतीय संस्कृतीमध्ये चार पुरुषार्थाचा विचार नेहमी मांडला जातो. ते म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष होय. धर्म आणि मोक्ष हे परम पुरुषार्थ आहेत. अर्थ आणि काम हे गौण पुरुषार्थ आहेत. एखाद्या माणसाला पैसे नाही मिळविता आले तरी तो विरक्तपणे जीवन जगू शकतो. ब्रहमचारी व्यक्तीचा उद्धार होत नाही, असे नाही. तो ही जीवन चांगले जगू शकतो. पण जीवनाची इतिकर्तव्यता धर्म आणि मोक्ष या दोनच पुरुषार्थामध्ये आहे. कारण मानवी जन्मच मुळात मोक्ष संपादन करण्याकरिता मिळालेला आहे. अर्थ आणि काम हे जर धमार्नुकूल असतील तर ते सुद्धा पुरुषार्थ ठरतात. पण जर धर्मविरुद्ध असतील तर ते पुरुषपराध ठरतात. अध:पतनाला कारणीभूत ठरतात. ‘धर्माविरुध्द भुतेषू कामोस्मि भरतर्षभ । हे अजुर्ना ! धर्माला अविरुद्ध असणारा काम म्हणजे मी आहे माझी विभूती आहे.जीवनाला धन आवश्यक आहे, पण हे धन म्हणजेच अर्थ ! जेवढा आवश्यक आहे तेव्हढेच याचे दुसरे रूप अनर्थकारक आहे. हे हि लक्षात असलेच पाहिजे. श्रीमद् भागवत ११ व्या स्कंधामध्ये धनाचे १५ अनर्थ सांगितले आहेत.
स्तेय हिंसाऽनृतं दम्भ: काम: क्रोध: स्मयो मद: ।भेदो वैरमविश्वास: संस्पर्धा व्यसनानि च ॥१८॥ अर्थ सर्वांगें अनर्थभूत । हें माझें वचन त्रिसत्य ।पृथ्वीमाजीं जे जे अनर्थ । ते ते अर्थांत उपजती ॥३॥पुसाल अर्थीचे अनर्थ । ते सांगतां असंख्य अनंत । संक्षेपें सांगेन येथ । पंधरा अनर्थ अर्थासी ॥४॥ ए. भा. ।।ज्याच्याजवळ धन आहे, त्याला सुखाने कधीही झोप येत नाही. कारण धन मिळविण्याचे कष्ट. रक्षणाचे कष्ट आणि नष्ट झाले तर अधिकच कष्ट. धनामुळे लोकात द्वेष उत्पन्न होतो. क्रोध येतो. संशय येतो. मत्सर ,लोभ, हिताहित काहीही कळत नाही. लोकसंग्रह व्यवस्थित होत नाही. तुका म्हणे धन । धनासाठी देती प्राण ।। धनसाठी प्राण देतातही आणि प्राण घेतातही. आपण कितीतरी वेळा वृत्तपत्रात धनासाठी नरबळी दिल्याच्या बातम्या वाचतोच ! म्हणून तुका म्हणे धन । भाग्य अशाश्वत जाण ।। हे भाग्य अशाश्वत आहे. नित्य नाही. बरे येथे मिळविलेले धन शेवटी बरोबर नेता येत नाही. आपल्याजवळ जोपर्यंत धन आहे तोपर्यंत नातेवाईक सुद्धा स्तुती करतात. पुढे पुढे करतात पण एकदा का तुमचे धन संपले की कोणी विचारीत नाही. जोवरी बरवा चाले धंदा । तोवरी बहीण म्हणे दादा ।। पैसा संपला की जवळचे दूर जातात. म्हणून जीवनात पैसा असावाच पण तो मर्यादित स्वरूपात असला तर पुरुषार्थ होतो. अन्यथा तोच पैसा आपला घात सुद्धा करतो.
विचार करा मित्रांनो ! रावणाची संपत्ती काय कमी होती का ? लंकेमाजी घरे किती ते ऐका। सांगतसे संख्या जैसी तैसी।।१।।पाचलक्ष घरे पाषाणांची जेथे।सात लक्ष तेथे विटेबंदी।।२।। कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची। शुद्ध कांचनाची सप्त कोटी।।३।।तुका म्हणे ज्याची संपदा एवढी। सांगाते कवडी गेली नाही।।४।। सोन्याची ज्याची लंका होती, त्याला शेवटी कवडीही बरोबर नेता आली नाही. एक सुभाषितकार म्हणतो धनानि भूमौ पशव: हि गोष्ठे, नारि गृहद्वारि जना: श्मशाने ! देहश्चितायाम्परलोक मार्गे, धमार्नुगो गच्छति जीव: एक: !! धन भूमीतच राहते ( पूर्वी बँक नव्हती ) पशु गोठ्यात राहतात. पत्नी घराच्या दारातच, लोक श्मशानात येतात पण चितेवर मात्र एका देहालाच जळावे लागते. बरोबर कोणाही येत नाही. फक्त धर्म (संस्कार ) येतो. म्हणून माणसाने जीवनात लोकोपकार करीत जीवन जगले तर ते कृतार्थ जीवन ठरते. अन्यथा काहीही उपयोग नाही. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज एका अभंगात सांगतात, धन मिळवोनि कोटी । सवे नये रे लंगोटी ।।१।।पाने खासी उदंड । अंती जासी सुकल्या तोंड ।।२।।पलंग न्याहल्या सुपाती । शेवटी गोवऱ्या सांगाती ।।३।। तुका म्हणे राम । एक विसरता श्रम ।।४।। म्हणूनच वेचोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच करी ।। या न्यायाने अर्थाचे अनर्थ लक्षात घेऊन जर त्याचा विनियोग केला, तर अनर्थ होणार नाही. अन्यथा हा अर्थ आपल्या जीवनाचा अनर्थ केल्यावाचून रहाणार नाही. हे लक्षात घेऊन जर मनुष्य जीवन जगेल तर तो फार चांगली जीवन शैली घेऊन जगेल व त्या जगण्याला काही तरी अर्थ राहील.-श्री अशोकानंद महाराज कर्डिले,गुरुकुल भागवताश्रम चिचोंडी(पाटील) ता. नगर ,मो. ९४२२२२०६०३