- विजयराज बोधनकररस आणि मुळातली शोधाची आवडच माणसाला कुठल्याही गुपिताचे संशोधन करण्यास भाग पाडते. खूप साऱ्या गोष्टी आहेत, ज्याचे गूढत्व अजूनही संपलेले नाही. निसर्ग म्हणजेच पंचमहाभूत आणि ईश्वर हे एक कायमचे गूढ आहे, तरीही त्याला शोधण्याचे ज्ञानमार्ग आहेत़ त्याला शोधण्याचे रस्ते बाहेर कुठे नसून, ध्यानमार्गावरच्या विशाल सुंदर दुनियेत आहेत़ ती दुसरी सुंदर दुनिया फार कमी जणांना पाहण्याची संधी मिळते. ही संधी साधून मिळत नाही. ईर्षेने, लोभाने या ध्यानमार्गाला प्राप्तही करून घेता येत नाही. ईश्वरतत्त्वाचे हळूहळू एकत्व लक्षात येऊ लागल्यानंतरच ईश्वरतत्त्व कणाकणाने समजत जाते. आताच्या भौतिक युगात हे ध्यानमार्ग बरेचसे कठीण होऊन बसलेले जरी दिसत असले, तरी मुळात ज्याला गुढत्वाला जाणून घेण्यात रस आहे, तोच या मार्गावरून प्रवास करू शकतो. राजसी, तामसी वृत्तीच्या माणसाला हा मार्ग जरी कठीण वाटत असला, तरी या दोन्ही प्रवृत्तीचा निचरा केल्याशिवाय हा मार्ग सोपा बनने कठीण होय. ध्यानमार्गाला एकच धर्म माहीत असतो, तो म्हणजे शरणागतीचा धर्म, जोपर्यंत समर्पित भाव मनात निर्माण होत नाही, तोपर्यंत ध्यानमार्ग दिसणे कठीण असते. षड्रिपूचा निचरा करणे जसे अवघड काम, तसेच गुढत्वाच्या मार्गावरून ईश्वरतत्त्वाचा शोध घेणेही कठीण काम, परंतु निर्विकार मनाच्या आनंदासाठी मात्र ध्यानाला थोडा वेळ देणे, इथल्या प्रत्येकाने आपला धर्म समजला पाहिजे. जात, धर्म, पंथ याचा ध्यानाशी काहीही संबंध नसतो. हे पहिले लक्षात घेतले पाहिजे. ध्यानातली सूक्ष्म जाणीवच मनाच्या स्फूर्तीचे कारण बनू शकते आणि तिथेच गुढत्वाच्या संशोधनाचे कार्यही प्रारंभ होऊ शकते.
ध्यानातली सूक्ष्म जाणीवच मनाच्या स्फूर्तीचे कारण बनू शकते...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 2:26 AM