- धर्मराज हल्लाळेबहाई धर्माचे संस्थापक बहाउल्लाह यांनी सांगितले आहे, ‘मानव जातीच्या पुत्रांनो धर्माचा मूळ उद्देश मानव हिताची रक्षा अन् मानवातील एकतेची भावना वाढविणे हा आहे. इतकेच नव्हे, तर ही भावना प्रेम आणि बंधुत्वाकडे घेऊन जाणारी असावी.’ नेमका हाच धर्म विचार जगातील सर्व धर्म, पंथांनी दिला आहे. बहाउल्लाह यांनी ‘किताब-ए-अकदस’ हा ग्रंथ लिहिला. त्यातील सिद्धांतानुसार ईश्वर एक आहे. विश्वशांती, विश्वएकता, सर्वांसाठी न्याय, स्त्री-पुरूष समानता, सर्वांसाठी शिक्षण, भौतिक वादातून निर्माण होणाºया समस्यांचे आध्यात्मिक समाधान, इतकेच नव्हे तर विज्ञान आणि धर्म याची सांगड घालणारा सिद्धांत बहाई धर्माने जगाला सांगितला आहे. विविध धर्मांचे विचार आणि त्यांच्या उपासना पद्धती वेगळ्या असल्या तरी मानव कल्याण हेच विश्वातील सर्व धर्मांचे मूळ आहे. नानाविध जाती, धर्म, पंथ आणि विविधतेत एकता गुण्यागोविंदाने नांदणारा भारत देश आहे. इथेच अलीकडच्या काळात उदयाला आलेल्या बहाई धर्माचेही अनुयायी राहतात. दिल्लीतील लोटस् टेम्पल सर्वांना माहीत आहे. बहाई धर्मियांचे ते उपासना स्थळ आहे. तिथे कुठलीही मूर्ती अथवा कोणतेही कर्मकांड नाही. विशेष म्हणजे विविध धर्मांशी संबंधित विचारांचे आदानप्रदान तिथे दिसते. हा धर्म सर्वांसाठी सर्वांकडून न्यायाची अपेक्षा करतो. स्त्री-पुरूष समानतेला प्राधान्य देतो. आजही स्त्री-पुरूष समानता हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे. स्त्रीचे दास्यत्व कायद्याने संपले असले, तरी तिचे दुय्यमत्व कोणताही कायदा संपवू शकला नाही. अशावेळी धर्म विचारांकडे पाहणाºयांनी धर्मग्रंथातील मानव हिताच्या सिद्धांताकडे पाहिले पाहिजे. अध्यात्म आणि विज्ञान याची सांगड घालणारा प्रगतशील विचार बहाई धर्माने दिला आहे. अध्यात्म मानवाच्या मनाचा उत्कर्ष घडवते. संतुलन राखते. शांतता प्रदान करते. त्याचवेळी तर्क, प्रयोग, अनुमानावर आधारित विज्ञान सतत सत्याच्या शोधात असते. प्रत्येक प्रयोगावेळी आलेला निष्कर्ष म्हणजे तेच अंतिम सत्य हे विज्ञान मानत नाही. तिथेही मानव जातीचा उत्कर्ष आणि कल्याण हा हेतू आहे. मानव जातीचा प्रवास हा अश्मयुगापासून आज विज्ञान युगापर्यंत आला आहे. धर्माने नीतिमान समाज घडण्याची दिशा दिली. तर विज्ञान मानवाचे जगणे सुसह्य करण्यासाठी तत्पर आहे. अशावेळी अध्यात्म आणि विज्ञान विचाराची सांगड घालणारा सिद्धांत प्रकट करणारा बहाई धर्म जगासमोर आहे. शिवाय अवतीभोवती दिसणारी प्रगती म्हणजेच जीवन असे समजल्याने भौतिक वाद वाढेल. त्यातून उपभोग संस्कृती जन्माला येईल. त्याचेही उत्तर अध्यात्म विचारात मिळेल, अशी धारणा बहाई धर्माची आहे. बहाउल्लाह यांनी म्हटल्याप्रमाणे मानव हिताचे रक्षण करताना धर्म प्रत्येकाला प्रेम आणि बंधुत्वाची शिकवण देतो. भेदाभेद अमंगळ हेच सांगतो. एकदा का मानव हित म्हटल्यानंतर समोरचा व्यक्ती कोणत्या धारणा मानतो, कोणती व कोणाची उपासना करतो यावरून त्याच्याशी सद्वर्तन करावे की दुर्वतन हे ठरवता येणार नाही. तो माणूस आहे, हे लक्षात ठेवून त्याच्या कल्याणाचाच विचार करावा लागेल. आपल्या मनातील पे्रमभाव, बंधुभाव हा सर्वांसाठी सारखा असला पाहिजे. तुम्ही ज्या धर्म विचारांच्या वाटेवर आहात त्याच वाटेवर जाणारा असो वा नसो तो माणूस आहे आणि त्याची माझी एकात्मता, एकजीवता भंग होणार नाही, हाच विचार मुळाशी असला पाहिजे. धर्माने दिलेला अखिल मानव कल्याणाचा संदेश प्रत्येकाच्या ठायी सदैव राहावा हीच आधारशिला बहाई धर्मानेही उभारली आहे.
धर्माचा मूळ उद्देश मानव हिताची रक्षा आणि एकता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 10:29 PM