- बा. भो. शास्त्रीकाही तरी होण्याचा भाव आपल्या हृदयात नेहमीच असतो. मोठं व्हावं, चमकावं, नाव सर्वत्र झळकावं, ही रास्त अपेक्षा असतेच आणि ती चुकीची नाही. कारण जीव हा मुळातच सापेक्ष आहे म्हणून तर गावात तात्या, आप्पा, नाना, काका, जीजा या उपाध्या आपण लावतो. त्यांनाही बरं वाटतं. ही आवड बालपणात अंकुरित झालेली असते. लहान मुलं पाहुणे घरात बसल्यावर मधीच लुडबुड करतात, मस्ती करतात. तेव्हा घरातले नेहमीच म्हणतात एरवी मुलं शांत असतात, पाहा कुणी आलं की मस्ती करतात. असं का होतं? इतरांना वेधून घ्यावं हा त्यांच्यातला भाव असतो. आपल्याला ओळखावं, सन्मान मिळावा हा हेतू असतो. भविष्यात हीच सन्मानाची भूक वाढते. त्यात अडथळा आला की क्रोध येतो. मोह येतो, स्मृतिभ्रंश व पुन्हा मोठं होता होताच माणूस लहान होऊन जातो. नंतर स्वत:च अडचणी निर्माण करून वेगळ्या मार्गाने चमकून जावं असं वाटतं. तेच खलांचं वाकडेपण पसायदानात सरळ करण्याचा प्रयत्न ज्ञानेश्वरीत केला आहे. सिद्धी नसताना प्रसिद्धीचा लोभ निर्माण होतो. अपयश आलं की रडणं सुरू होतं, याला सर्वस्व जबाबदार स्वत: आपणच असतो. रडण्याची चावी अपेक्षाभंगात असते. जेवढी अपेक्षा मोठी तेवढा आक्रोश पण मोठा असतो. नागदेवाला खूप मोठी आशा होती ती मोक्षाची. पण स्वामी म्हणाले, तो तुला लवकर मिळणार नाही. कारण तुझ्यात अनंत दोष आहेत. त्याची अपेक्षा भंगली. तो उठून गुंफेमागे गेला व रडत बसला. स्वामी मागे गेले. त्याचं सांत्वन करत म्हणाले, ‘‘धीरवीरा होआवे’’ अर्जुनाच्या रडण्यातून गीता, वाल्मीकीच्या शोकातून रामायण, नागदेवाच्या रडण्यातून प्रस्तुत सूत्र जन्माला आलं, जग रडतं याला दोनच कारणं आहेत. धैर्य आणि शौर्य याचा अभाव. विपन्नावस्थेत संघर्षात जे टिकले ते कधीच रडले नाहीत, शूरता लढते व धीरता धीर कमी होऊ देत नाही. दोन शक्ती एक एकाला पूरक आहेत.
धीरवीरां होआवे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 4:53 AM