सोलापूर : ‘धर्म मार्गात राहून कर्माचरण करणाºयांचे चित्त स्थिर होऊन मन:शांती मिळते व त्यायोगे सुख प्राप्त होते व शेवटी मोक्ष ही साधतो’ असे प्रतिपादन गौतम मुनीजी यांनी केले.
प. पू. श्री विनय मुनिजी म. सा. यांच्या नेतृत्वाखाली चातुर्मासानिमित्त आयोजित गुरु आनंद कमल कन्हैया धर्मसभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत. या चार पुरुषार्थात मुख्य पुरुषार्थ धर्मच होय. अधर्माचरणाने सुखप्राप्ती होत नाही तसेच अधर्माने मिळवलेला पैसाही टिकत नाही. अधर्माच्या मार्गाने केलेली कामे फलप्रद होत नाहीत. मानवी जीवनात धर्माचरणाने प्रतिष्ठा प्राप्त होते.
मानवाची कर्मे त्याच्या मनाच्या शुद्धतेसाठी तसेच अशुद्धतेसाठी कारणीभूत असतात. सदाचाराने मनशुद्धी होते तर दुष्कर्माने ते अपवित्र होते. व्रत, उपवास, जप, पूजा यामध्ये आनंदी वृत्ती होणे सुरुवातीस जरा कठीण वाटत असले तरी हळूहळू अभ्यासाने ती वृत्ती बळावून मन शक्तिसंपन्न होते.
अशा सत्कर्माचरणासाठी अनुकूलता प्राप्त करून घेण्यास आळस आड येत नाही. प्रपंचात गुरफटून गेलेल्या मनुष्यास सत्कर्म करण्यास वेळच मिळत नाही हे म्हणणे चुकीचे आहे. सत्कर्माचरणाने विवेक प्राप्त होतो. विवेकाच्या योगाने ज्ञानप्राप्ती होते व ज्ञानाने मोक्षप्राप्ती होते.
मनात भक्ती असेल तर फळ मिळतेच हे सांगताना त्यांनी जितेंद्र बलदोटा यांचे उदाहरण दिले. सेवा क्षेत्रात ते सदैव तत्पर असतात. मुनींबरोबर रोज गोचरी म्हणजे भोजन आणण्यासाठी बलदोटा हे तीन-चार किलोमीटर रोज सोबत चालतात अशा शब्दात त्यांनी बलदोटा यांचे कौतुक केले. - गौतम मुनीजी, सोलापूर