- फा. फ्रान्सिस दिब्रिटोमाणसाने माणसाशी माणसासम वागणे, हे गाणे कार्यक्रमाच्या वेळी कानावर पडते. ते आपल्याला भावते; परंतु मनाला प्रश्न पडतो की, माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागण्यासाठी किती लाख वर्षे घेतलेली आहेत आणि अजूनही तो त्या कलेत पारंगत झाला आहे, असे त्याला म्हणता येईल का? दररोजची वर्तमानपत्रे चाळली तर त्यात हिंसाचाराच्याच बातम्या आढळतात. आपल्या नीतीशास्त्रात माणसाने कसे वागावे, याचा वस्तुपाठ दिलेला आहे. बायबलकालीन काळात समाजाला मोठ्या प्रमाणात हिंसाचार होता. तेव्हा टोळ्यांचे राज्य होते. एखाद्या गुन्ह्याबद्दल प्रतिस्पर्धी टोळीचा पूर्णपणे विध्वंस केला जात असे. मोजेसने सुधारित नियमशास्त्र दिले.
उदा. डोळ्यासाठी डोळा, दातासाठी दात. म्हणजे एका गुन्ह्याबद्दल एकच शिक्षा. हेही माणुसकीला धरून नव्हते. माणसाने माणसाशी कसे वागावे हे सांगण्यासाठी देवपुत्र प्रभु ख्रिस्ताला जन्म घ्यावा लागला. प्रभुने आपल्या प्रवचनात म्हटलेले आहे, डोळ्याबद्दल डोळा व दाताबद्दल दात असे सांगितले होते; मी तर तुम्हास सांगतो, आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कराच, परंतु आपल्या वैºयावरही प्रीती करा. प्रभु येशू ख्रिस्ताने सांगितले, ‘तुम्हाला जीवन मिळावं आणि ते विपुल प्रमाणात मिळावं.’ परिपूर्ण मानवी जीवन म्हणजे पशुत्वावर मात करून आपल्यातील दैवत्वाला जपणे. तो आपल्या जीवनभराचा कार्यक्रम आहे.
आपल्या संस्कृतीने आपल्याला जगण्याची चतु:सूत्री दिली आहे. ती म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष. ही पार पाडताना आपल्याला अर्थ आणि काम या पुरुषार्थाचे पालन करणे आवश्यक आहे. माणसाने अवश्य धनप्राप्ती करावी. ते आवश्यक आहे. ती कशी करावी यासंबंधी संतांनी मार्गदर्शक सूत्रे दिली आहेत, ‘जोडुनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी’ अर्थप्राप्ती नीतीच्या मार्गाने करावी आणि त्यात गरजवंतांनाही सहभाग द्यावा, हा मोक्षाचा मार्ग आहे.