- सद्गुरू जग्गी वासुदेवस्वार्थ अटळ आहे. कारण आपण केवळ आपल्या नजरेतून आयुष्याकडे पाहू शकतो आणि त्या परीने ते समजू शकतो. तुम्ही स्वत:ला स्वार्थी होण्यापासून वाचवू शकत नाही. ‘मला स्वार्थी नाही व्हायचं, मला स्वार्थी नाही व्हायचं...’ हे उद्गारच मुळात खूप स्वार्थी आहेत. स्वत:कडे नीट बघा आणि मला सांगा, तुम्ही खरंच नि:स्वार्थी बनू शकता का? तुम्ही कोणत्याही अनुषंगाने या गोष्टीकडे पाहा, तुम्ही आयुष्याकडे फक्त स्वत:च्या डोळ्यांनी बघू शकता. म्हणूनच नि:स्वार्थी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. स्वत:ला नैतिकतेच्या मोजदंडात मापू नका. जरा पाहा, नि:स्वार्थी बनून जगता येतं का? स्वत:ला असं समजावून स्वत:ची फक्त फसवणूक होईल. नि:स्वार्थीपणा हे असत्य आहे, जे नैतिकतेमुळे या जगात जन्माला आलं आहे. यामुळे जगात फक्त लोकांची फसवणूक होत आहे. लोकांना वाटतं, ‘ते काहीतरी नि:स्वार्थी हेतूने करत आहेत’. स्वार्थी व्हा, पूर्णत: स्वार्थी होऊन जा. तुमची समस्या अशी आहे की, तुम्ही स्वार्थी होतानासुद्धा कंजुषी करता. आता तुमचा स्वार्थ ‘मला आनंदी व्हायचं’ इथपर्यंतच मर्यादित आहे. संपूर्ण स्वार्थी बना: ‘अख्ख ब्रह्माण्ड आनंदात असलं पाहिजे. प्रत्येक अणून अणू संतुष्ट असला पाहिजे. पार स्वार्थी होऊन जा. चला स्वार्थी होऊ या, यात अडचण काय आहे? असिमित, अमर्याद स्वार्थी होऊ यात! निदान स्वार्थ जपण्यात कुठे कमी पडू या नको. शून्य का अमर्याद तुम्हाला एखादं शिखर गाठायचं असेल, तर तिथे दोन मार्गांनी जाऊ शकता: एक तर तुम्ही शून्य होऊन जा किंवा अमर्याद व्हा. नि:स्वार्थी होताना तुम्ही खाली येता- स्वत:ला दहावरून पाचवर आणता, परंतु स्वत:ला पूर्णपणे मिटवू शकत नाही, पण जेव्हा तुम्ही स्वत:बद्दल बोलू लागता, तिथे वेगळं अस्तित्व निर्माण होतं आणि म्हणून शून्यात विलीन होणं कठीण होऊन बसतं. यासाठी तुम्ही अमर्याद होणं उत्तम. तो तुमच्यासाठी जास्त सोपा मार्ग आहे.
स्वार्थी बनताना...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 5:13 AM