- वामन देशपांडे
ज्ञानदेवांनी भगवद्गीतेविषयी विचार प्रगट करीत असताना श्रोत्यांना मोठ्या प्रेमाने सांगतात की,हे शब्देंवीण संवादिजे। इंद्रिया नेणतां भोगिजे।बोलाआदि झोंबिजे। प्रमेयासी।जैसे भ्रमर परागु नेती। परी कमळदकें नेणती।तैसी परी आहे सेविती। ग्रंथी इथे।ज्ञानेंद्रियादी इंद्रियांना या संवादाची जाणीव होऊ न देता, गीतेमधल्या श्रेष्ठ तत्त्वज्ञानाचा रस प्रत्यक्ष चाखावा. गीतेमधले अर्थभारले श्लोक त्यातला प्रत्येक शब्द प्रकट होण्यापूर्वीच त्यातून व्यक्त होणाऱ्या शाश्वत सिद्धांतांना आपण गाढ आलिंगन द्यावे. भोवती गुणगुणणारा भ्रमर जसा, जे कमळ उमलून आलेले असते, त्या कमळाला अजिबात जाणीव होणार नाही याची काळजी घेत, त्यातल्या परागाचे जसे सेवन करतो ना, तसा गीतार्थाचा शाश्वत आनंद आपण मनमोकळेपणाने लुटावा. चित्त एकाग्र करून गीतेची अत्यंत संवेदनशील मनाने आनंद घेत, गीतार्थाचा पूर्ण उपभोग घ्यावा. ज्ञानदेव अत्यंत विनम्र स्वरात गीताभाष्य सुरू होण्यापूर्वी म्हणतात, माझे गीताभाष्य म्हणजे तुम्हा पंडित मंडळींना बोबडे बोल वाटतील. मी तर तुमच्यासमोर लहान मूलच आहे. तुम्ही तर माझे मायबाप आहात. मूल बोबडे जरी बोलले, तरी आईवडिलांना आनंदच होतो. कारण एकच ते बोबडे बोलणारे बाळ त्यांचेच असते. श्रोतेहो, तुम्ही संतहृदयी आहात, हे मला ज्ञात आहे. म्हणून मला खात्री वाटते की, या माझ्या गीताभाष्यप्रसंगी काही चुका झाल्या, तुम्हाला माझ्या या भाष्यामध्ये जरी दोष आढळले, तरी तुम्ही माझे दोष आणि झालेल्या चुका पोटात घालाल. तरीही एक मी कबूल करतोपरी अपराधु तो आणीक आहे।जे मी गीतार्थु कवळू पाहें।ते अवधारा विनवू लाहे। म्हणउनिया।श्रोतेहो, तुम्ही माझे मायबाप आहात, म्हणून माझ्या मनातले गीतेविषयीचे जे भाव आहेत, ते प्रकट करतो. मला हे ज्ञात आहे की, गीतेवर भाष्य करणे सोपे काम नाही, तरीही मी गुर्वाज्ञेने गीताभाष्य करायला तुमच्यासमोर बसलो, हाच माझा फार मोठा अपराध आहे. मी गीतार्थाला आलिंंगन देऊ पहातोय, परंतु मी दुर्बल आहे, हे ठाऊक असूनही मी तुम्हाला विनवणी केली. गीताभाष्यापूर्वी ज्ञानदेवांनी विनम्र भूमिका घेतली. ज्ञानदेवांचे सद्गुरू श्रीनिवृत्तीनाथ, त्यांच्यासमोरच बसलेले होते. वास्तविक पाहता, हा श्रोतृसंवाद आपल्या सद्गुरूंना आपली मर्यादा कथन करण्यासाठी ज्ञानदेव प्रगट करीत होते.