- विजयराज बोधनकरहट्टीपणा म्हणजेच जुगारीवृत्ती, हट्टीपणा हा केवळ ‘अतिआत्मविश्वासामुळे’ मनात दडून बसलेला असतो, सत्याचा मार्ग कधीही दु:ख निर्माण होऊ देत नाही, माणूस कितीही मोठा असला तरीही त्याच्या हट्टीपणाच्या कुकर्माने निर्माण झालेल्या पापात कुणीही सहभागी होत नाही. त्याउलट सत्याच्या मार्गावरून चालता चालता शेकडो हजारो प्रामाणिक हात आपल्या हाताला बळ देऊन जातात. त्याउलट देवत्वाचा मुखवटा घालून त्या खाली कुकर्माचा घाट घालणारे शेवटी तुरुंगाची हवा चाखत बसतात आणि आपल्या आंधळ्या हट्टीपणामुळे लोभात गुरफटून आपलं व सामाजिक स्वस्थतेच्या नुकसानीला जबाबदार ठरतात, अशी अनेक उदाहरणे आपल्या डोळ्यापुढे येतील.त्यातलं एक उदाहरण म्हणजे महाभारतातील आंधळा जुगार म्हणजेच द्यूत, पांडव आणि कौरव यांच्यातील प्रेमाचा समन्वय तोडणारा एक क्रूर खेळ, कौरव हे मुळातच कपटी सोबतीला शकुनीसारखा अतिलोभी प्रवृत्तीचा खलनायक असल्यामुळे त्या जुगाराला आणखी तामसी किनार लाभली. त्या उलट पांडव हे सात्विक धर्मपरायण, सुसंस्कारी होते; परंतु जेव्हा ते द्यूत खेळायला बसले आणि शकुनीच्या कपटी फासांमध्ये अडकत गेले तशी पांडवांतील संयमी वृत्ती ढासळत गेली.पांडवांचा प्रमुख ज्येष्ठ बंधू धर्मराजही आंधळा होऊन हट्टाला पेटला. शकुनीच्या जाळ्यात अडकत गेला. सर्व संपत्ती गमावून बसला. शेवटी आपण एक तरी डाव जिंकू या हट्टातून मोहात अडकतच गेला आणि आपल्या धर्मपत्नीला शेवटी जुगारावर लावून सर्वस्व हरवून बसला. शेवटी पांडव बलशाली असूनही पराजयाचे दु:ख पचवीत वनवास भोगत बसले. याला कारण फक्त धर्माची मोठी घोडचूक म्हणजे त्याला जुगारावरून मोठ्या हिमतीने उठता आलं नाही, तो घसरतच गेला आणि संस्काराचा आणि संपूर्ण कुटुंबाचा सर्वनाश ओढवून घेतला.
महाभारतातील धर्माची घोडचूक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 5:17 AM