- प्रा. सु. ग. जाधव
विचारवंतांना नेहमी हा प्रश्न पडतो की मी कशासाठी जन्मलो आहे ? मला काय साध्य करायचे आहे ? ते साध्य करण्यासाठी माझ्याकडे कोणती साधने आहेत? आणि मी ते कसे साध्य करू शकतो? या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधातच समस्त विद्या, शास्त्र आणि शस्त्र यांची निर्मिती झाली आहे. असे असूनही मानवाला सत्याचा शोध लागला नाही. त्याला परमेश्वर प्राप्ती झाली असे खात्रीलायक सांगता येत नाही. संतांना मात्र परमेश्वर प्राप्ती झालेली असते आणि त्यांनी ती कशी करावी याचे मार्गदर्शन ते आपल्या साहित्यामधून समस्त मानव जातीला करीत असतात.
संत परमेश्वराचा अर्थातच सत्याचा शोध स्वत:मध्ये घेतात तर शास्त्रज्ञ मात्र त्याचा शोध बाह्य जगतामध्ये घेतात. दोघेही सत्याच्या शोधासाठी प्रयत्न करीत असले तरी त्यांची साधना आणि मार्ग मात्र परस्पर भिन्न आहेत. परमेश्वराने किंवा निसर्गाने प्रत्येक मानवाला एकाच प्रकारची साधन संपत्ती दिली आहे़ जेणेकरून तो आपल्या जीवनाचे इतिकर्तव्य साध्य करू शकतो. हे साधन म्हणजे आपले शरीर होय. शरीर हे माध्यम आहे. म्हणूनच 'शरीर माध्यम खलु धर्मसाधनम्' असे म्हटले जाते. परंतु सुखलोलुप माणसं मात्र शरीराचा उपयोग इंद्रिय सुखासाठीच करतात आणि आपल्या जीवनाचे इतिकर्तव्य विसरून जातात. संत मात्र याबद्दल मानवाला वारंवार आठवण करून देत राहतात आणि परमेश्वरापर्यंत जाण्यासाठी मार्गदर्शनही करतात.
निसर्गाने मानवाला केवळ शरीरच दिले असे नाही तर शरीरासोबतच मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार याही बाबी दिल्या आहेत. याठिकाणी अहंकार म्हणजे 'गर्व' असा अर्थ नाही. शरीर हे पंचमहाभूतांनी तयार झालेले आहे. यामध्ये पृथ्वी, आप म्हणजे पाणी, तेज, वायू आणि आकाश यांचा समावेश असतो. ही पाचही महाभूत विशिष्ट प्रमाणामध्ये एकत्र आल्यानंतर आणि त्यामध्ये आत्मतत्त्व मिसळल्यानंतर तो देह तयार होतो. या पाचही तत्वांचे वेगवेगळे गुण आहेत. असे असूनही या सर्वांपासून तयार झालेल्या शरीराचा ध्येय साधण्यासाठी 'साधन' म्हणून उपयोग केला पाहिजे. यासंदर्भात संत ज्ञानेश्वर म्हणतात, 'तैसे देहांतेचेनि विषमवाते । देह आत बाहेरि शेलष्मा आते । तै विझोनी जाय उजिते । अग्निचे जेंव्हा ।' (ज्ञा. ८.२३. २१३)
अशाप्रकारे विविध घटकांपासून तयार झालेला आहे़ म्हणून याबद्दल अहंता आणि ममता न धरता, त्याचे लाड न करता त्याचा योग्य उपयोग करून घ्यावा. याबद्दल ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,
'आता जायांचे लेणे । जैसे अंगावरी आहाचवाणे । तैसे देह धरणे । उदास तयांचे ।(ज्ञा. ९.२९. ४१२)
अर्थात देहाबद्दल कोणत्याही प्रकारची आसक्ती न ठेवता उदासपणे देहाचा वापर करावा. पण असे करीत असताना देहाची योग्य ती काळजी घेणे, देह सुदृढ ठेवणे हे देखील तेवढेच आवश्यक आहे. याबद्दल ज्ञानेश्वर माऊली पुढे म्हणतात,
'पार्थ परिसिजे । देह हे क्षेत्र म्हणिजे । हेचि जाणे जो बोलिजे । क्षेत्रञु एथे' (ज्ञा. १३.१.७)
हे शरीर क्षेत्र होय व त्यातील आत्मा हा क्षेत्रज्ञ होय. आत्मा नसल्यास या क्षेत्राचा काहीही उपयोग होत नाही. म्हणूनच आपला देहा अत्यंत मौल्यवान असून तो गेल्यावर त्यासाठी कितीही रुपये दिले तरीही तो प्राप्त होणे केवळ अशक्य आहे. हे माहीत असूनही अनेक लोक या देहाचा गैरवापर करून घेतात. म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,
'मग केवळ ये देह्खोडां । अमध्योदकाचा बुडबुडा । विषयपंकी सुहाडा । बुडाले गा ।।'(ज्ञा. १६. ९.३१७)
चंगळवादी लोक या विषयरुपी चिखलामध्ये बुडून हातात. त्यांना आपल्या ध्येयाचा विसर पडून ते लोक आत्मनाश करून घेतात आणि पुन्हा पुन्हा दु:खाच्या गर्तेमध्ये बुडतात. यांच्याबद्दल कळवळा येऊन जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात, 'बुडती हे जने देखवेना डोळो म्हणुनी कळवळो येत असे'
काही विचारधारेमध्ये देह अत्यंत अपवित्र आहे असे मानले जाते़ परंतु हे चुकीचे आहे. कारण ते जर अपवित्र असेल तर तो निसगार्ने आपल्याला का दिला बरे? देह हा पवित्रच आहे आणि त्याचा उपयोग पवित्र कामासाठी केला गेला पाहिजे. म्हणूनच 'देह देवाचे मंदिर' असे म्हटले जाते. देहाबाबत अतिशय उदास राहून चालणार नाही़ अर्थात त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही़ तसेच देहावरच लक्ष केंद्रीत करून आत्म विकासाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. कारण हेही तितकेच आत्मघातकी आहे. स्वत:ला देह समजणे यालाच 'देहात्मक बुद्धी' असे म्हटले आहे आणि असे मानणे हे सर्वात मोठे पाप आहे, असे पंचीकरण ग्रंथात म्हटले आहे. थोडक्यात देह आहे तरच आपण कोणत्याही प्रकारचे कार्य करू शकतो अन्यथा केवळ आत्मा काहीही करू शकत, नाही हे विसरता येणार नाही.
(लेखक यशवंत महाविद्यालय नांदेड येथे प्राध्यापक, संत साहित्याचे अभ्यासक आणि ज्ञानेश्वर अभ्यास मंडळाचे सचिव आहेत)