मानवी जीवन जगत असताना मानवाला असंख्य अनुभव येत असतात. त्यामध्ये काही अनुभव सुखद तर काही दुःखद असतात. सुखद अनुभव मनुष्य घटाघटा पिऊन टाकतो तर दुःखद अनुभव आयुष्यभर कुरवाळत बसतो. दुघट घटनांची मालिका पुन्हा पुन्हा आठवत बसतो आणि आणखी- आणखी दुःखी होत असतो. स्वतः तर दुःखी होतोच सोबतच सभोवतलच्या लोकांना दुःखी करतो किंबहूना सपूंर्ण वातावरणच दुःखमय करून टाकतो. मग जगातील संपूर्ण दुःख त्याच्याच वाट्याला आले असे तो समजूत करून घेतो. परंतू जगातल्या दुःखाची त्याला कल्पना नसते. मग ह्यालाच आयुष्य म्हणावे का? तर नाही. जो जीवनातील दुःखांना, संकटांना समर्थपणे तोंड देवू शकत नाही, तो खरे जीवन जगू शकत नाही. मानवी जीवनाचा आस्वाद घेवू शकत नाही. आयुष्याचा खरा आनंद घ्यावयाचा असेल तर प्रत्येकाने दुःखासोबत दुःख हे हसतमुखाने स्विकारलेच पाहिजे कारण-
“जीवन असते वाट काटेरी रानावनातून जाणारी अडथळ्यांना पार करून भविष्याला शोधणारी”
या जगात दोन प्रकारची माणसे आढळतात. एक माझा अर्धा पेला रिकामा आहे म्हणून रडणारी तर एक माझा अर्धा पेला भरलेला आहे म्हणून समाधान माणून आनंदी राहणारी. जीवनात समाधानातच खरे सुख असतं आणि सुख हे मानण्यात असतं. जीवनाकडे तटस्थ दृष्टीने पाहीले तर “जीवन हे रडण्यासाठी नसून लढण्यासाठी आहे”. जीवनातील संकटांना जे सातत्याने लढवून परत पाठवितात तेच यशस्वी होतात आणि आज आपल्या देशाला खंबीर मनाच्या माणसांचीच गरज आहे, क्रियाशिल माणसांचीच गरज आहे. खंबीर आणि तरूण मनाच्या मानसिकतेची माणसेच स्वतःचा व सोबतच देशाचा विकास करू शकतात. तारूण्य हे वयावर नसून ते आपल्या विचारांवर अवलंबून असते.
एक कवी म्हणतो- युवक उसे नही कहते । जो तुफानोसे डर जाते है। युवक तो उसे कहते है । जो तुफानो का रूख बदल देते है।
स्वामी विवेकानंदांनी सुद्धा देशाच्या स्वातंत्र्यासाठी विकासात्मक कायापालट करण्यासाठी खंबीर मनाच्या केवळ शंभर युवकांची आवश्यकता आहे असे म्हटले होते. परंतु आपले दुर्दैव त्यांना ह्या विशालकाय देशात शंभरही खंबीर मनाचे ‘युवक’ मिळाले नाहीत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनीही अशाच प्रकारची माणुसकीची हाक संपूर्ण देशाला मारली होती. ते म्हणत- मज माणुस द्या, मज माणुस द्या। ही भिक मागता, प्रभू दिसला। संपूर्ण देशामध्ये त्यांना एकही खरा ‘माणुस’ न मिळणे ही ह्या देशाची शोकांतिका आहे. देशाचे दुःख हे प्रत्येक मनुष्याचे दुःख असते. देशातील प्रत्येक सच्चा माणुस हा देशाचा अनमोल ठेवा असतो. देश सुखी असेल तरच देशातील प्रत्येक मनुष्य सुखी होवू शकतो. म्हणूनच देशामध्ये खरे क्रियाशिल व सृजनशिल तरूण तयार व्हावयास पाहिजे. प्रखर बुद्धीमान व खंबीर मनोवृत्तीचे क्रियाशिल मनुष्यबळ हीच देशाची खरी संपत्ती आहे. त्यामुळेच मनुष्याची मानसिकता, विचार व कृती ह्यामध्ये एकरूपता असणे आवश्यक आहे. जीवनात सुखामागून दुःख व दुःखामागून सुख असा सुखदुःखाचा लपंडाव सातत्याने सुरू असतो. त्यामुळेच सुखासाठी सातत्याने धडपडणारी माणसे वाट्याला दुःख आल्यावर खचून जातात आता सर्व संपेल असे समजून आयुष्य संपून टाकतात. ही भेकड मानसिकता समाजातून आज बदलण्याची गरज आहे. त्यासाठी विचारांवर ताबा पाहिजे. सातत्याने मनामध्ये संताचे सद्विचार अंगी बाणवले पाहिजेत किंबहूना आपली मानसिकताच सद्विचारी बनली पाहिजे. जगात कितीही वाईट घडत असले तरी आपण वाईट व्हावयाचे नाही. वाईटांचा परिणाम हा वाईटच होणार व चांगल्याचे चांगलेच होईल ही आपली मानसिकता पाहिजे. सद्विचारांसाठी चांगल एकावं लागेल, चांगलं पहावं लागेल. सातत्याने हा चांगलेपणा जोपासल्याने आपले जीवन आनंदमय होईल आणि इतरांचे जीवन आनंदी होईल. संत तुकारांमानीही सांगीतलेले आहे-
आनंदाचे डोही आनंद तरंग । आनंदची अंग आनंदाचे ।।
संतांच्या विचारांनी सुद्धा जगातील दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या संतविचारांचा प्रचार होण्याची आवश्यकता आहे. या शतकाची परिभाषा बदलेली आहे. ती प्रत्येकाने समजावून घेणे आवश्यक आहे. जीवन कितीही गतिमान झाले असले तरी विचार मात्र आपल्या ताब्यात असले पाहिजेत. अन्यथा विचारांच्या गतिमान प्रवाहात आपले संपूर्ण आयुष्यच वाबून जावू शकते. विचारांची ताकद खुप महान आहे. जीवनाचे नंदनवन करण्याचे किंवा वाळवंट करण्याची क्षमता विचांरामध्ये आहे. म्हणून सकारात्मक विचार सतत मनामध्ये राहणे आवश्यक आहे. सतत सकारात्मक विचार केल्याने जीवनात आमुलाग्र बदल घडून आणू शकतो.कारण एक शायर असे म्हणतो-
वो चाहो तो इन्सान बना सकता है। ऐसे वैसे को सुल्तान सुल्तान बना सकता है। उसकी शक्ती को समझो दुनियावालो सद्विचार पत्थर की मुरत को भगवान बना सकता है ।।
जीवनातील सर्व लढाया विचारपूर्वक विचारांचे नियोजन करून, कृतीची जोड देवून जिंकता येवू शकतात. म्हणून प्रत्येक व्यक्तीने समाजाला व प्रत्येक पालकाने आपल्या मुलाला, प्रत्येक शिक्षकाने आपल्या विद्य़ार्थ्याला सद्विचारांची शिदोरी द्यावयास पाहिजे त्यामुळे सर्व वातावरण कसे आनंदमयी होईल. यासाठी प्रत्येकाने सद्विचार अंगी बाळगल्याने सत्संगत प्राप्त होईल. सत्संगतीने हातून सत्कृत्य घडतील आणि सत्कृत्य केल्यानेच जीवनात आंनंद-अमृताची फळे मिळून सद्गती प्राप्त होईल यात तिळमात्र शंका नाही.
डॉ. हरिदास आखरे श्री. म. बि. बुरूंगले विद्यालय, शेगांव