माणसं अलीकडे माणसांना भेटतच नाहीत, असं कधी-कधी वाटतं. माणसांच्या गर्दीत माणूस माणसं शोधताना दिसतो. काय शोधतात? माणूसपण. मनन, चिंतन आणि आपलंपण, भौतिक शोध खूप झालेत, बोध हरपला असं वाटतं. अशी भेट दुर्मीळ झाली. भेट होत नाही, असंही नाही, पण त्यात ओढ नाही. भेटीत नजरेच्या धडका होतात. घातक शब्दांचा संघर्ष उभा राहतो. भेटीत संवाद नाही. जिव्हाळा नाही, आर्तता नाही. संस्कार व उद्बोधन नाही, आनंदाचे तरंग निर्माण होत नाही. म्हणून चक्रधर भेटीचं स्वरूप आपल्या सूत्रातून सांगतात.
‘‘भ्रमत भ्रमता भेटी: कां आपजौनिभेटी: एकमेका भेटलेया हे भेटलेयाचा पाडु जाए’’ या सूत्राचा केंद्रबिंदू ‘हे’ अक्षर महत्त्वाचं आहे. ‘हे’चा अर्थ परमेश्वर म्हणजे आनंद असा आहे. भेटीच्या मिलनात आनंद वाटला पाहिजे. उगीच भेटलो असं न म्हणता, बर भेटलो, असं म्हणता आलं पाहिजे. दोन चांगल्यांच्या भेटीत तो सोहळा जन्माला येतो. राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर या सहा विकारांचं प्रक्षेपण देहबोलीतून होत असतं. डोळ्यातून कामाचा संचार होतो, तेव्हा कामाला काम, क्रोधाला क्रोध, मदाला मद व मत्सराला मत्सर भिडतात व प्रेमाच्या संचाराने विकार निर्विकार होतात. मग ‘मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे’ असं वाटायला लागतं. चंद्र जवळ आला की, सागराच्या लाटा थयथय नाचायला लागतात. अशा स्वस्थचित्ताच्या लोकांनी सतत भ्रमण करावं, हाच धर्माचा खरा हेतू आहे. वारं फिरतं गवताची पेरणी होते. पाणी वाहतं प्राण्यांची तहान भागवतं. सज्जन फिरतात, विवेकाचं वाटप होतं. सज्जनांची भेट ही वेधाने बोधाची घेतलेली ही भेट आहे. ज्ञानाने विरक्तीला व विरक्तीने भक्तीला भेटावं, भेटल्याने दक्षता योग्यता वाढते.
- बा.भो. शास्त्री