डॉ. दत्ता कोहिनकर -
जगात कुठेतरी सकाळ होते तर कुठेतरी रात्र.. उजेड आणि अंधाराचा खेळ कित्येक वर्ष सुरूय.. माणूस आणि निसर्ग त्याच्या अंतरंगात समाविष्ट असलेल्या प्रत्येक घटकाने आपआपलं जीवन हे वर्षानुवर्षे, शतकानुशतके या दिनचर्येला वाहून घेतल्या आहेत. ही सर्व मंडळी निसर्गाच्या अधीन आहेत हे त्रिकालबाधित सत्य आहे. पण माणूस नावाच्या प्राण्याला त्याच्या उत्पत्तीपासूनच गर्वाचा मुकुट मिळाला आहे. म्हणून मग तो सातत्याने निसर्गावर हुकूमत गाजवण्याचा प्रयत्न करत असतो.पण निसर्ग त्याची सर्व बालिश रूपे पाहतो पाहतो आणि फारच डोक्यावरून पाणी जायला लागले एकच आपत्ती अशी उभी करतो व ती त्याच्या अहंकार जिरवण्यासाठी पुरेशी ठरते. याहून काय ती वेगळी परिस्थिती सध्या अवतीभवती नाही. ज्यावेळी आपल्याकडचे सर्व प्रयत्न कमी पडू ;लागतात तेव्हा वेळ आणि निसर्गाच्या कलेने घेणेच केव्हाही शहाणपणाचे ठरते. नाहीतर पूर्णपणे उध्वस्त होण्याला एक पाऊल पण फार होते. या घडीला वेळ मजबूत परिस्थितीत आहेत आणि आपण हतबल.. पण वेळ सिकंदर जरी तिला अस्थिरतेचा शाप आहे. म्हणून थोडा संयम ठेवूया.. परिवर्तन सृष्टीचा नियम आहेच..
मित्रांनो, लक्षात ठेवा एक छोटे छिद्र मोठ्या जहाजाला बुडवते. म्हणून वेळीच सावध व्हा. सदैव जागरुक रहा. आपल्या एका क्षुल्लक चुकीमुळे आपल्या कुटुंबाची व आपल्या समाजाची प्रचंड हानी होऊ शकते हे लक्षात असू द्या.मित्रांनो ज्या घरात बसून तुम्ही वैतागला आहात ,त्या घरात जाण्यासाठी लोक हजारो किलोमीटर मुलाबाळांसह पायी प्रवास करत आहेत. शासन या लोकांना दिसतील त्या ठिकाणी क्वारंटाईन करत आहे. म्हणून घरी रहा. सुरक्षित रहा. बाहेरच्या लोकांना, मित्रमंडळींना ,पाहुण्यांना घरी बोलावू नका .आता पुन्हा एकदा सांगतो काळजी घ्या म्हणजे काळजी करावी लागणार नाही.
सध्याची वेळ खतरनाक आहे. म्हणतात ना कालाय तस्मै नम : अशावेळी आपण सर्वजण भाजी दूध, मेडिकल सेवा ,व काहीजणांना अत्यावश्यक सेवेतील नोकरी करण्यासाठी बाहेर जावे लागते.अशा या महत्त्वाच्या कारणांसाठी आपण आपल्या व आपल्या कुटुंबाच्या जीवाची आज बाजी लावतोय. हे सर्व करत असताना मित्रांनो खूप काळजी घ्या. बाहेर खूप भयानक अवस्था आहे. कोणीतरी संक्रमित व्यक्ती कधी तुमच्या संपर्कात येईल व कधी तुम्हाला लक्षणे जाणवतील काहीही सांगता येत नाही.शासकीय यंत्रणा , पोलीस , डॉक्टर , अनेक संस्था आपल्या साठी जीवाची बाजी लावत आहे . आपण फक्त घरात थांबा व नियमांच पालन करा .या जगातील प्रत्येक गोष्ट अनित्य व परिवर्तनशील आहे .
गीतेत सांगितलं आहे , परिवर्तन संसार का नियम है. कोरोनाची ही महामारी पण जाणारच आहे पण ती लवकर घालवण्यासाठी आपण सर्वांनी शासकीय नियमांच पालन केले तर महामारी गायब होऊन लवकरच लॉकडाऊन खुले होईल . भारत संकटाला त्वरित चारी मुंड्या चीत करु शकतो, हे जगाला दाखवून देऊया. कारण भारत हा ऋषीमुनी, संत, बुध्दांचा देश आहे .