- विजयराज बोधनकर
आपली निंदा करणारा किंवा आपल्याला छळणारा जीव आपल्या आयुष्यात येतो हे आपलं सद्भाग्य म्हणावं. तो आपल्या झोपल्या बुद्धीला जागं करतो, जोश निर्माण करतो, मनात खळबळ निर्माण करून देतो. आपली उगाच खालची जागा दाखवून देतो. मग छळवणूक सहन करणारा त्याला दाखवून देतो की, बघ मी कसा आयुष्यात पुढे जाऊ शकतो. आपली कुणी चेष्टा करतो तेव्हा आपल्या सन्मानाला ठेच पोहोचते आणि आपली संपूर्ण ऊर्जा पणाला लावून त्याच्या चेष्टेला उत्तरं देताना आपली कार्यक्षमता वाढवून घेत राहतो.
फक्त आपण सकारात्मक वृत्तीने ही बाब स्वत:च्या नजरेत आणून द्यायला हवी. निंदा करणारा, अपमान करणारा आपल्या कुंडलीतील शनी जरी वाटत असला तरी आपल्याला खडबडून जागं करणारी ती एक छुपी प्रेरणाच असते. उगाच का तुकाराम महाराजांनी म्हटलं की, निंदकाचे घर असावे शेजारी. पांडवांच्या कुंडलीत शंभर निंदक होते म्हणून त्यांचा भव्य विजय झाला. त्यांनी युद्ध करायला भाग पाडलं. ज्यांनी ज्यांनी युद्ध स्वीकारलं तेच अजरामर झालेत. निंदा करणारा कधीच प्रगती करू शकत नसला तरी तो इतरांच्या प्रगतीला प्रेरक ठरत जातो.
जितके जास्त निंदक ज्याच्या नशिबी आलेत समजावे तितकी जास्त प्रगती त्याच्याकडून नियतीला हवी आहे. तुमचा मत्सर करणारे तुमच्या प्रगतीवर अस्वस्थ होत असतात. म्हणजे तुम्ही प्रगतिपथावर आहात असं समजावं. फक्त आपण कुणाची निंदा करू नये. कारण आपल्याला प्रगती करण्यासाठी नियतीने आपल्याला जन्माला घातलंय आणि त्या प्रगतीला पोषक बनविण्यासाठी निंदकही नियतीने आपल्याला पदरी पाठविले. निंदकाला कधीही कमी लेखू नये. याचं कारण असं आहे की नियतीने तुम्हावर केलेली ती कृपादृष्टी असते. जो छळला जातो तोच उत्तम मार्गाकडे वळतो. कोळशातच शेवटी हिरे सापडतात. कोळसा आणि निंदा करणारा समान भूमिकेत असतो.