- बा.भो. शास्त्रीआपला मुलगा वा मुलगी हाताच्या बाहेर गेले म्हणून निराश होणारे आईबाप आपण पाहतो. ते हताश होतात. त्यांना दिलासा देणारंं हे सूत्र आहे. जसे आईबाप, जशी शाळा, जसा सहवास तसे संंस्कार त्यांंना मिळतात का? त्याचा ध्वनीचा उच्चार, त्यांंच्या देहबोलीत होणारा बदल लक्षात येतो का? आम्ही मुलांच्या भावभावना समजून घेतो का? हे सगळे प्रश्न आई व बाप यांच्यासाठी आहेत. थोडीशी खराब वस्तू फेकणं शहाणपण नाही. तिला दुरुस्त करायचंं असतंं. टाकाऊ वस्तूतून टिकाऊ वस्तू तयार केल्या जातात. प्रदर्शनात त्याच बक्षिसं पटकावतात.
स्वामींंनी त्यांच्या चरित्रात अनेक मळलेली माणसंं उजळून टाकली. सहवासाने उजाळा मिळतो, संंस्काराने जीवनाला आकार येतो. संंसारात वावरताना चुका होतच असतात, धूळ उडतेच, डाग पडणार, मळ लागणारच हे कुणालाही चुकवता येत नाही. कर्माचे डाग लागतच असतात, पण ते धुतलेही जातात. चूक होते ही चूक नाही तर क्षमा मागितली जात नाही ही चूक आहे. आधी आपण राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर या सहा विकारांंच्या सहवासात असतो. हे सहाही विकार आपल्याबाहेर नसून आपल्यातच असतात.
हा आतला सहवास आहे. त्यातून ज्याचा आपल्यावर प्रभाव पडतो आपण तसेच होऊन जातो व तशाच लोकांंचा संंग आपल्याला आवडतो. त्यांच्या गुण तसेच अवगुणांचा आपण अजिबात विचार करीत नाही. जणूकाही आपल्या डोळ्यावर झापडेच लागलेली असतात. हा आतून झालेला फार मोठा बिघाड आहे. याचा खुलासा श्रीचक्रधर स्वामींनी अनेक जागी केलेला आहे. उजळणे म्हणजे चमकून जाणे, चकाकणे, ज्याच्या जीवनात आचाराची शुद्धता व विचाराची परिपक्वता आहे, अशांंंचा संंग स्वामींंना अभिप्रेत आहे. ज्ञात आणि विरक्त हे दोन घटक त्यात महत्त्वाचे आहेत. ज्ञानाची संगत संंस्कार घडवून जागविते व विरक्ती आसक्तीतून सुटका करत असते.