-डॉ. दत्ता कोहिनकर
एकदा अक्षय भेटायला आला. मला म्हणाला, एका मुलीबरोबर माझे प्रेमसंबंध होते पण तिच्या घरच्यांनी तिचे लग्न बळजबरीने त्यांच्याच नात्यातील एका मुलाबरोबर लावून दिले. हे दु:ख विसरण्यासाठी मी एका गुरूच्या आश्रमात गेलो तेथे त्यांनी मला दीक्षा दिली. आता आश्रमातच राहतो व अजपाजप गुरूमंत्र म्हणतो. मला आश्रमाच्या चौकटीत-नियमात रहावे लागते. नकारात्मक विचारांमुळे शरीरात संप्रेरकांचे असंतुलन झाले व स्वभावधर्माच्या विरोधात अर्थात निसर्गाच्या विरोधात गेल्यामुळे अक्षयला डिप्रेशन आले होते. मित्रांनो आपल्या मनात अनेक इच्छा, वासना, प्रेरणा, नैसर्गिक स्वरूपात निर्माण होतात. आपण त्या इतरांपुढे व्यक्त करणे शिष्टसंमत नसल्यामुळे दाबून टाकतो. आपण दडपलेल्या इच्छा सहजासहजी नष्ट होत नाहीत. स्वत:चे अस्तित्व दाखवण्यासाठी त्या वारंवार प्रकट मनाकडे झेपावत राहतात. पण दडपणामुळे - सामाजिक बंधनाच्या अविवेकी दृष्टीकोनामुळे, प्रकट मन त्या इच्छांना ठोकरत व त्यांचे दमन होते. दमन केल्यावर त्या मनातून नाहीशा झाल्या अशी चुकीची आपली समजुत असते. प्रत्येक व्यक्ती ही कुठल्या ना कुठल्या इच्छांच दमन करत असते. हे दमन खूप तीव्र प्रमाणात व अजाणता असेल तर ते अबोध मनाला न जुमानता संधी मिळताच मनोविकृतीच्या रूपाने वर येते. मनोविश्लेषणशास्त्राच्या नुसार मानसिक विकृतीचे मुळ हे प्रामुख्याने अबोध मनात दडपलेल्या कामभावना व आक्रमक भावनेत असते. अक्षय हा मुळातच अध्यात्मिक प्रवृत्तीचा नव्हता. तो अपघाताने अध्यात्यात - आश्रमात आला होता. आश्रमात त्याने सर्व भावभावना दाबून टाकल्या होत्या. त्यामुळे दबलेली उर्जा - केमिकल लोच्याच्या रूपाने अक्षयला नैराश्याकडे घेऊन गेली होती. मी अक्षयला जे वाटतंय ते बिनधास्त बोलायला लावलं. त्याला आश्रमातून काही दिवस बाहेर पडून सिनेमा, मित्रमंडळी, मैत्रिणी, सहल, उत्तम आहार, योगा, प्राणायाम, ध्यान, यात सामील व्हायला लावलं व सर्व भावभावनांच व्यवस्थापन शास्त्र सांगितलं. अविवाहीतांसाठी हस्तमैथून हा वासनापूतीर्चा व ताणतणाव निवारणाचा योग्य मार्ग आहे. फक्त त्याचा अतिरेक होता कामा नये. त्याने कसलाही अपाय होत नाही हे त्याला समजावून सांगितले. विचाराचे महत्व सांगताना, नकारात्मक विचार नकारात्मक तरंगाशी आपल्याला जोडतो व नकारात्मक विचारामुळे अहितकारक स्त्राव, उच्चरक्तदाब यामुळे आपली हानी कशी होते हे पटवून दिले व नकारात्मक विचारांना सकारात्मक करून मनाला सकारात्मक विचारांचे खाद्य (स्वसंवाद) दयावयास सांगितले व १० दिवशीय विपश्यना शिबिरात बसवले. शिबीरानंतर अक्षय मोकळा झाला. आज तो नोकरी करून मजेत जगतोय. नुकतेच त्याचे लग्न ठरलेय. पत्रिकेत गुरूवर्य म्हणून प्रेषकाच्या कॉलममध्ये माझे नाव झळकत आहे.