तुमची सर्वात प्रबळ आसक्ती ही तुमची धन-दौलत, तुमचे घर, तुमची मुलेबाळे किंवा तुमचा पती किंवा पत्नी यांच्याप्रति नाही. तुमची सर्वात सखोल आसक्ती तुमचे विचार आणि तुमच्या भावनांशी आहे - नेहमीच. ‘नाही, मला माझी पत्नी प्रिय आहे, माझे मूल मला प्रिय आहे,’ असे तुम्ही म्हणाल. पण जेव्हा तुमची पत्नी, तुमचे मूल किंवा तुमच्या भोवतालची परिस्थिती यात तुमचे विचार, विचारसरणी आणि भावना विरुद्ध जातात, तेव्हा हे सर्व काही कोसळते. फक्त तुमचे स्वत:चे विचार आणि भावनाच तग धरून राहतात. खरे पाहता, आयुष्यात हेच तुम्ही जमवलेले आहे. तुमची विचार करण्याची पद्धत, तुमचे भावना व्यक्त करण्याचे मार्ग, तुमच्या कल्पना, तुमची विचारसरणी, तुमच्या धारणा आणि मान्यता... यात हे सारे तुमच्या भोवतालच्या इतर गोष्टींना चिकटून वाढत जाते. म्हणून हेच तुम्ही टाकून देणे गरजेचे आहे. तुमचे घर किंवा तुमचा बँक बॅलन्स नव्हे. तुमची विचार करण्याची पद्धत, भावना व्यक्त करण्याच्या रीती, तुमची विचारसरणी - तुमचे व्यक्तिमत्त्व, हेच तुम्ही खरोखर गोळा करून ठेवले आहे. हेच तुम्ही टाकून देणे गरजेचे आहे.‘माझ्याजवळ एक कल्पना आहे’ याचा अर्थ, हा काही बोध किंवा वास्तविकता नव्हे. ही केवळ विशिष्ट प्रकारची कल्पना आहे. विचारधारा म्हणजे एक संघटित कल्पना. ही कल्पनाच तुम्हाला वास्तविकतेपासून अलग करते. ही कल्पना जेव्हा मोठ्या प्रमाणावर संघटित केली जाते, तेव्हा ती तुम्हाला पूर्णत: वास्तविकतेपासून विभक्त करते. कल्पना फार आकर्षक आहे. जेव्हा ती मोठ्या प्रमाणात संघटित केली जाते, तेव्हा ती खूपच आकर्षक बनते. पण तुम्हाला वास्तविकतेपासून जर दूर केले गेले, तर खरोखर तुम्ही एक अर्थपूर्ण जीवन जगू शकाल का? खऱ्या अर्थाने तुम्ही वास्तविक जीवन जगू शकाल का? तुम्ही जीवन अनुभवू शकाल का? जीवन जाणून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ते जसे आहे तसे जाणून घेणे.-सद्गुरू जग्गी वासुदेव
वास्तवात परत या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 5:19 AM