मनुष्य एकवेळ भुकेला राहू शकतो पण तो एकटेपणा जास्त काळ सहन करू शकत नाही. त्याला एकटेपण खायला उठतो. नंतर मग तो स्वतःशी संवाद साधत जातो. ज्यावेळी रस्त्यावर अशा व्यक्ती लोकांच्या नजरेस पडतात तेव्हा त्यांना वेडं ठरवायला सुरुवात होते. खरतर ते स्वतःच्या आयुष्याला पडलेल्या कोड्याचे उत्तर शोधत राहतात. पण कदाचित ते त्यात इतके गुरफटत जातात कि स्वतःच्या इंद्रियांवरचे नियंत्रण सुटून आयुष्य भरकटत जाते. पण अध्यात्माच्या क्षेत्रात ह्याच अवस्थेला फक्त जितेंद्रिय राहून परमात्म्याशी संवाद स्वतःच्या आयुष्याचा शोध घेत समाज कार्य करत प्रत्येक जीवाच्या आनंदासाठी झटणाऱ्याला संत, महात्मे अशी उपाधी मिळते. ''येणे सुख रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येत..!''हा तुकाराम महाराजांचा अभंग माणसाला एकांताचे महत्व अधोरेखित करून देतो...
संत ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू तुकोबाराय , थोर समाजसुधारक गाडगेमहाराज,कुष्ठरोग्यांसाठी आयुष्य खर्ची करणारे बाबा आमटे यांसारख्या महात्म्यांना लोकांनी अगोदर वेडेच ठरवले होते. नंतर मात्र त्यांना डोक्यावर घेऊन नाचतात..म्हणून वेडेपणा अंगी बाळगूनच हाती घेतलेल्या कार्यात स्वतःला पूर्णतः झोकून द्यावे.. अथक परिश्रमांचा सिलसिला अखंडपणे सुरु ठेवावा जोपर्यंत हाती घेतलेलं ते कार्य सिद्धीस जात नाही...
आयुष्यात समाधानी राहायचा मूळ स्त्रोत हाच आहे, "स्वतःशीच प्रामाणिक" व्हा. आपल्याला आतून वाटते काहीतरी एक, आपण बाहेर दाखवतो काहीतरी दुसरेच — हा लपाछपीचा खेळ एक दिवशी मोठ वादळाचे रूप घेतो. आयुष्यात कोणतेही काम असो त्याला स्वतःशी पूर्णपणे प्रामाणिक राहून आपले हंड्रेड परसेंट त्याला द्यायचे. दुसऱ्यांना चांगले वाटले पाहीजे, त्यांना माझे काम भावले पाहिजे, त्यांनी मला लाईक करायला हवे, माझी वाहवाह करायला हवी म्हणून मी हे काम उत्कृष्टरित्या पार पाडेल असे करू नका. जर ह्याच मानसिकतेसोबत जगलात तर आयुष्यात कधीच समाधानी नाही होणार.
पण जेव्हा आपण काही चुकीचे करतो तेव्हा ते करण्याअगोदर आजूबाजूला नक्की पाहतो परंतु "आपल्या आतल्या बाजूला" पाहायचे आपण विसरतो. ते हृदय, ते मन आपल्याला पाहत असते. आजूबाजूच्या वाईट वाटो किंवा नको पण आपल्याला आतून माहित असते आपण चुकीचे करतोय.आयुष्यात खरे समाधान "पूर्ण प्रामाणिकपणे" काम करून त्यात मिळवण्यात असते. हे आपण स्वतःसाठी करतो — दुसऱ्यांनी पाहायला हवे म्हणून नाही. समाधान तुम्हाला आतून येणाऱ्या भावनांनी मिळेल, त्याला बाहेरच्या जगात शोधू नका. कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी!! समाधान, आनंद आपण बाहेर शोधतो — जो बाहेर नाहीच त्याला शोधून काय उपयोग!!
दुसऱ्यांना ध्यानात ठेवून कर्म केलीत तर आपण "चांगले वाटतो थोड्या लोकांना!!" परंतु आपले काही थोड्या लोकांना "चांगले वाटणे" बाकीच्यांना "चांगले वाटत" नाही. आणि इथून सुरु होतो संघर्ष! ह्या दुनियेशी आणि अधिक महत्वाचा तो म्हणजे "स्वतःशीच!!"
''जगाने तुम्हाला पाहायला हवे म्हणून पर्वताच्या शिखरावर जाऊ नका. पर्वताच्या शिखारवर ह्यासाठी जा कारण की तुम्हाला जग पाहायचे आहे...''