- डॉ. दत्ता कोहिनकर
येरवडा कारागृहात विपश्यना ध्यान साधनेचे बंदिजनांसाठी आयोजित केलेल्या शिबिराचे मौन सुटले. बंदिवान एकमेकांशी बोलू लागले. 30 वर्षे वयाचा तानाजी एम.बी.ए. पर्यंत शिक्षण घेऊन एका नामांकित कारखान्यात उच्चस्पद पदावर काम करत होता. पत्नी, आई-वडील, दोन लहान मुले असा सुखाचा संसार चालला होता. त्याचा शेताच्या बांधावरून चुलत्याबरोबर झालेल्या भांडणात क्रोधाग्नी भडकल्यामुळे - तानाजीचा स्वतःवरील ताबा गेला व त्याने चुलत्याच्या डोक्यात फावडे मारल्यामुळे चुलता जागेवरच मृत्युमुखी पडला. तानाजी जन्मठेपेची शिक्षा आज भोगत आहे. शिबिरानंतर माझ्याशी त्याने मन मोकळे केले होते. काही क्षणाचा क्रोध तुमचं जीवन उध्वस्त करू शकतो. गीतेत म्हटले आहे. क्रोधात भवति संमोहः संमोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धीनाशः बुद्धीनाशात प्रणश्यति॥ (क्रोधामुळे व्यक्तीचा विवेक सुटतो, तो सुटल्यामुळे स्मृतिदोष जडतो. स्मृतीदोषामुळे बुद्धीनाश होतो व त्यामुळे व्यक्तीचा विनाश होतो.) क्रोधामुळे मनुष्य हिंसक बनतो. त्यामुळे त्याच्या हातून वाईट कृत्ये घडू शकतात. कुटूंबात वडील क्रोधी असतील तर त्याचे दुष्परिणाम मुलांच्या कोवळया मनावर होतात. त्यामुळे मुले दुर्बल किंवा पापभिरू होतात. क्रोधामुळे मनुष्य विचारहीन होतो. रागाच्या भरात खून होतात. रक्तदाबाचे विकार बळावतात. मज्जासंस्था दुर्बल होते. मनुष्य समाजापासून-घरापासून दूर फेकला जातो. त्याच्या जीवनात अपयश येते. क्रोध विचारात विसंगती आणतो. नैराश्याकडे मनुष्याची वाटचाल होते.
क्रोधामुळे डोळे लाल होणे, छाती धडधडणे, नाकपुडया फुगणे, शरीर थरथरणे, अन्नावरची वासना उडणे, रक्तातील साखर वाढणे, अल्सर होणे, हृदयविकार असे अनेक दुष्परिणाम शरीरावर दिसून येतात. त्याचप्रमाणे मानसिक स्तरावर कामात लक्ष न लागणे, एकाग्रता ढळणे, निर्णयक्षमता कमी होणे, बदल्याची भावना निर्माण होऊन द्वेष वाढणे असे अनेक दुष्परिणाम दिसून येतात. वरील शारीरिक व मानसिक परिणामांचे एकत्र फलित म्हणजे क्रोधी व्यक्ती हृदयविकार, अर्धांगवायू, मधुमेह, अल्सर, अॅसिडीटी, अर्धशिशी अशा अनेक व्याधींनी ग्रस्त होतात. क्रोध हा आपली फार मोठी हानी करतो. एकदा एक शेतकरी द्वेषयुक्त अंतःकरणाने गौतम बुध्दांना वाईट बोलून त्यांचा अपमान करू लागला. बुध्दांनी त्याकडे बघून स्मितहास्य केले. आनंदला या गोष्टीचा खूप राग आला. त्याच्या श्वासाची गती वाढली, डोळे विस्फारले गेले, हृदयाची धडधड वाढली तेव्हा बुध्द आनंदला म्हणाले, आनंद चुक शेतकरी करतोय त्याची शिक्षा तू का भोगतोयस ? आनंद- क्रोध येणे ही एक शिक्षाच आहे. तापट माणसाला वेगळी शिक्षा करायची गरज काय? त्याने शिव्यांची भेट आणली आपण ती स्वीकारलीचं नाही. त्याची भेट त्याच्याजवळच. आनंदला आपली चुक लक्षात आली. क्रोध व्यक्त केल्यानंतर लक्षात येते. ज्या कारणासाठी आपण रागावलो ते कारण किती क्षुल्लक होते पण अहंकाराने आपण प्रतिक्रिया देऊन दुःखाचे भागीदार झालेलो असतो.
रागाच्या बाबतीत बेंजामिन फ्रँकलिन म्हणतो," इंग्रजांच्या अत्याचाराची चीड आली म्हणुन तर स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लोक एकत्र आली. सर्व स्वातंत्र्यविरांच्या रागाचे कारण हे चांगले होते. आई-मुलाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मुलावर रागावते. तिच्या मनाची चेतना शुध्द असते. आधुनिक काळात काही वेळेस रागावल्याशिवाय लोक ऐकत नाही. काम करत नाही. त्यावेळेस त्यांच्यावर ओरडावेच लागते. पण हा क्रोध दर्शवताना आतून मन शांत ठेवता आले पाहिजे. क्रोधाचा नुसता अभिनय करता आला पाहिजे. त्यासाठी क्रोधाला आवरणे महत्वाचे आहे. म्हणून क्रोध आला कि 1 ते 10 आकडे मोजा किंवा त्वरित पाणी प्यायला जा. दीर्घश्वास घ्या अथवा ते स्थान सोडून निघून जा. नुसता श्वास सहजपणे जाणत रहा. एखादया व्यक्तीविषयी खुपच राग मनात असेल तर पलंगावर बसून त्या व्यक्तीला डोळयांसमोर आणून तक्क्या किंवा उशीला जोरजोरात गुद्दे हाणा. यामुळे मनात दबलेला क्रोध बाहेर पडतो. ही उर्जा बाहेर पडल्यामुळे मन शांत व हलके होते. याला '' पिलो-फायरिंग '' म्हणतात. त्या व्यक्तीच्या नावाने पत्रलिखाण केले तरी क्रोधयुक्त भावना मोकळया होतात. फक्त ते पत्र फाडून फेकून टाका. सर्वात महत्वाचे म्हणजे क्रोध आला की तात्काळ प्रतिक्रिया देऊ नका. जॉर्ज गुजिएफला त्याच्या शांत स्वभावाचे रहस्य विचारले असता तो म्हणाला वडिलांनी मला मरताना Always react after 24 hours हा एकच मंत्र दिला. म्हणून क्रोध आला असता सजग व्हा. क्रोध हा आपला शत्रु आहे. वरील उपायांनी त्याला काबूत ठेवा व आनंदाने जगा.