बोलण्यात राही निर्भय । कष्ट करण्यातही पुढेच पाय ।। वागणूक तरी आदर्श ।राहे प्रचारकांची ।।
वाढत चाललेल्या दांभिकतेवर अत्यंत मार्मिक असे आसूड राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी उगरलेला आहे. स्वतःच्या हितासाठी माणसे दिवसरात्र झटत आहेत. आणि दैनंदिन गरजा भागविण्यासाठी या ना त्या मार्गाने अर्थार्जनात सोबतच स्वार्थ देखील वाढत असून चांगुलपणा मात्र कमी होताना दिसत आहे. ' बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले ' असे जरी प्रचलित असले, तरी त्याची खंत मनाला लागून राहते. ग्राम विकास हा केंद्रबिंदू मानून कित्येक ध्येयवेडे कार्य करत होते, करत आहेत, आणि करत राहतील परंतु बदलत्या काळानुसार स्पष्टपणा कमी होऊन भयमुक्त व सांशकता पूर्ण वातावरणाची निर्मिती होताना दिसून येते.
आत्मकेंद्री वृत्ती कमी होऊन व्यक्तिपूजेचा संचार होताना दिसत आहे. खुशमस्करीपणा वाढीस लागलेला आहे. त्यामुळे विकासात बाधा निर्माण होताना दिसते. अशा प्रसंगी संत श्री तुकडोजी महाराजांनी म्हटल्याप्रमाणे व्यक्ती हा निर्भय असावाच. परंतु तो दिलेले काम करण्यास देखील पुढे असला असला पाहिजे. असे त्यांनी सांगितले आहे. 'लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण'अशा प्रकारची मनोवृत्ती स्वतः व राष्ट्राच्या विकासात बाधा असते. सदविवेक बुद्धीने आदर्श स्वरूपाचे वागणे ही सर्वांना दिशा देऊन जाते. आणि त्यातूनच नवचैतन्य निर्माण होते.
अंगा भरला ताठा । नये वळणी जैसा खुंटा ।।कैसे न कळे त्या डेंगा ।हित आदळले अंगा ।।
संत शिरोमणी तुकाराम महाराजांनी देखील वरील अभंगाच्या ओळी ताठर मनाची तुलना अत्यंत कठोर वेडेवाकडे अशा खोट्या सोबत केली आहे. अशा ताठर व ढोंगी वागण्यामुळे स्वतःचे व कुटुंबाचे आणि पर्यायाने समाजाचे अहितच होते. कामचुकार व दृष्टप्रवृत्तीची तुलना व ओझे वाहणाऱ्या आणि नदीतून जाणाऱ्या गाढवा सोबतच केली आहे.
त्याचे असे घडले की एका व्यापार्याने त्याच्या व्यापाराकरिता ओझे वाहण्यासाठी म्हणून एक गाढव खरेदी केले. व्यापाऱ्यास मिठाची पोती नदीपात्राच्या एका तीरावरून दुसर्या तीरावर न्यावयाचे होते. त्यांनी गाढवाच्या पाठीवर ते दोन मिठाची पोती ठेवले.आणि त्यास नदीपात्रातून दुसर्या तीरावर जाण्यासाठी हाकलले मिठाचे ओझे जड होते. त्यामुळे गाढवाचे पाय दुखायला लागले. पाय घसरून पाण्यात पडले. त्यामुळे मिठाचा पाण्याशी संपर्क होऊन मीठ विरघळू लागले. आणि गाढव काठावरी येईपर्यंत बरेच मीठ कमी होऊन ओझे कमी झाले होते. ही युक्ती वाढली. त्याचा कामचुकारपणा जागा झाला. पण अज्ञानी गाढवास वस्तू ज्ञानाचे वावडे होते. पुढच्या वेळी देखील ओझे वाहताना समान युक्ती अवलंबण्याचा गाढवाने प्रयत्न केला. परंतु पुढच्या वेळी मात्र व्यापाऱ्याने त्याच्या पाठीवर कापसाचे ओझे लादले होते. गाढवाने ओझे कमी करण्याच्या उद्देशाने नदीपात्रात घसरून पडल्याचे नाटक केले.
वस्तूज्ञानात अज्ञानी असणाऱ्या गाढवाच मात्र ओझे कमी होईल असे वाटले. आणि प्रत्यक्षात मात्र उलटेच घडले पाणी कापसामध्ये घुसल्यामुळे कापूस ओला होऊन वजन अधिकच जड झाले. यामुळे गाढव काठावर येता-येता मूर्च्छित अवस्थेत गेले. तात्पर्य हेतुपरस्पर कामचुकारपणा व आळस हा प्रत्येकाचा घातच करत असतो. व सर्वांसाठी तो घातक स्वरूपाचा असतो. म्हणून महाराजांनी याचे उत्तम वर्णन केलेले आहे.
श्रम ही फक्त एकट्या दुकट्या ची बाब नसून सांघीक स्वरूपात श्रम करण्याची गरज असून श्रमाने श्रम परिहार होतो. व देश ऐक्य वाढीस लागते. असे विशद केले आहे अंततः एकच सांगणे की,
सर्वांनी सर्वांशी पुरक व्हावे । ऐसे धर्माचे सूत्र बरवे ।हे काय तुम्हासी सांगावे शहाणे जन हो ।- डॉ.भालचंद्र संगनवार ( जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक, लातूर. )