जीवनाच्या प्रत्येक क्षणात मनाचा सहभाग फार महत्त्वाचा असतो. शरीराला जेव्हा मनाची जोड लाभते, तेव्हा खरा आनंद निर्माण होऊ शकतो. शरीराची आणि मनाची एकरूपता जीवन समृद्ध करणारी असते. मानवी मनाचे विश्वचैतन्य अनुभवण्यासारखे असते. शरीर आणि मनासह अंतर्बाह्य चैतन्याचा संवाद हा अध्यात्माचा गाभा असतो. मनाच्या प्रगल्भ विचारांनी जगता जगता जीवनाच्या वाटेवरचा आनंद उपभोगता येतो.
मनामध्ये निर्माण होणाऱ्या निरनिराळ्या कल्पना आश्चर्यकारक असतात. मनामध्ये केव्हाही, कुठल्याही कल्पना येऊ शकतात. उदा. नैसर्गिक-अनैसर्गिक, श्लील-अश्लील इ., पण मनाला सात्त्विकतेमुळे चैतन्यत्व प्राप्त होते. त्यामुळे मन धुतल्या तांदळासारखे स्वच्छ होते. मग मान-अपमान यामुळे मन दुखावले जात नाही. मोठ्या ताकदीने आणि आत्मशक्तीने कुठलेही दु:ख पेलण्याला ते समर्थ बनते. मग स्वत:च स्वत:च्या आनंदात रममाण होते. आपल्यामध्येच ते स्वत:ला शोधत असते. एका नव्या शोधामध्ये ते राहते. आव्हानात्मक गोष्टी स्वीकारते. ते मन जगण्याचे सर्व सोहळे पूर्ण करते. त्याला रुचेल, पचेल तेवढेच ते स्वीकारते. वेगवेगळे प्रयोग राबविते. त्यामुळे मन प्रफुल्लित होते. तत्त्वज्ञानात्मक बनते. मनाप्रमाणे ती व्यक्ती त्याच्या प्रत्येक कामातून, वागण्यातून कळते. बऱ्या वाईटाचा परिणाम काय होतो याचा विचार मन करते.
मन नेहमीच स्वत:चा मार्ग, स्वत:चे अस्तित्व शोधत असते. अशा मनात अध्यात्माची बिजे सापडतात. व्यक्तिगत जीवनात विचार न अनुभवता मन त्याचे रूपांतर एका शुद्ध अनुभूतीमध्ये करते. मनाचे उत्कट अनुभव जीवनाचे सुंदर, संवेदनक्षम पदर उलगडून दाखविते. त्यामुळे मनात आणि शरीरामध्ये जेवढे स्मरण आतून येते, ती मनाच्या शुद्धतेची पावती असते. कारण आपण जे अनुभवतो, ते मनापासून. आपण त्या गोष्टीत रमलेलो असतो तेव्हा आपले मन आपल्या जगण्याशी एकरूप झालेले असते. त्यामधूनच आपला आशय बनत असतो. मन त्या व्यक्तीला स्वस्थ बसू देत नाही. आतून, बाहेरून ते त्या व्यक्तीला कृतिशील बनविते. असे कृतिशील मनच मनुष्याला योग्य दिशेला नेण्याचे काम करीत असते.
- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज
(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)