भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवंविधोर्जुन।ज्ञातुं द्रष्टुच तत्त्वेन प्रवेष्टंच परन्नप।।पार्था, तू माझे चतुर्भुज दर्शन, माझे ब्रह्मांडव्यापी स्वरूप प्रत्यक्ष कुरूक्षेत्रावर, ऐन युद्धप्रसंगी अनुभवलेस. हे भाग्यशाली चतुर्भुज दर्शन केवळ वेदांचे अध्ययन करून, तपश्चर्या करून, दानधर्म करून अथवा यज्ञयाग करून पाहिले जाऊ शकत नाही, हे तू कायम लक्षात ठेव. पार्था, जे केवळ माझीच अनन्य भक्ती करतात, तत्त्वत: जे माझे परमभक्त मला जाणून घेण्याचा अखंड प्रयत्न करतात, माझ्या सगुण साकार रूपाला प्रत्यक्ष अनुभवण्याची ज्यांना तीव्र ओढ लागलेली आहे, ज्या माझ्या भक्तांना माझ्या दिव्य स्वरूपात विलीन होऊन जावेसे वाटते, त्याच परमभक्तांना माझे चतुर्भुज दर्शन घेणे शक्य आहे. जो माझ्या दिव्य स्वरूपाशी अभिन्न होऊन प्रत्येक क्षण माझ्याच नामात वेचतो, जो माझ्या प्रसन्नतेसाठी प्रत्येक विहित कर्म निष्काम वृत्तीने करतो, जो पूर्ण आसक्तीविरहित आयुष्य जगतो, अहिंसक कृतीने विश्व अनुभवतो, तो माझ्या परमभक्त मलाच प्राप्त होतो. त्यालाच माझे चतुर्भुज दर्शन घडते. भगवंतांनी मानवी अस्तित्वाला दोन अमोघ शक्ती दिल्या आहेत. एक आहे चिंतनशील मन आणि दुसरी अप्रतिम शक्ती म्हणजे संपूर्ण भगवंत निर्मित विश्व, ज्ञानपातळीवर प्रत्यक्ष पाहण्याची. माणसापाशी चिंतनशील मन आहे, म्हणून तर तो दृश्य पातळीवर प्रत्यक्ष पाहतो. ते भगवंतांचेच प्रकट सुंदर रूप आहे, याची जाणीव त्याला होते. भगवंतांनी भक्तश्रेष्ठ अर्जुनाला आपल्या असंख्य विभूती आहेत, त्यातच मन गुंतवून, भगवंतांचेच चिंतन करण्याचा महत्त्वाचा विचार गीतेमधल्या दहाव्या अध्यायात आपल्या विभूती कथन करताना दिला आणि अकराव्या ‘विश्वरूपदर्शन’ अध्यायात त्या सर्व विभूतींचे ब्रह्मांडव्यापी स्वरूपाचे दर्शन घडवून चराचरात परमेश्वरी अस्तित्व नांदत आहे, हे पाहण्याची दिव्य दृष्टी दिली.वामनराव देशपांडे
ब्रह्मांडव्यापी स्वरूप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 5:14 AM