जीवनात प्रत्येक व्यक्ती सुसंस्कृत आणि साक्षर असणे याला फार महत्त्व आहे. व्यक्तीच्या अंगी हे दोन्ही गुण असणे फार महत्त्वाचे आहे. ह्या दोन्ही गोष्टी व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर फार प्रभाव टाकतात. यामुळेच सुसंस्कृत आणि साक्षर असणाऱ्या व्यक्तीची समाजात एक वेगळी ओळख असते. हे दोन्ही गुण अंगी असणारे व्यक्ती जीवनात यशस्वी झालेले दिसून येतात. सुसंस्कृतपणा आणि साक्षरता या जरी भिन्न गोष्टी असल्या तरी यांचा एकमेकांशी खूप मोठा सहसंबंध आहे. एखादी व्यक्ती सुसंस्कृत असणे म्हणजे काय ? सुसंस्कृतपणा म्हणजे काय ? याचा जीवनाशी, व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाशी काय संबंध ? तसे पाहिल्यास अनेक जण साक्षर असणाऱ्या व्यक्तीला सुसंस्कृत समजतात. परंतू साक्षर असणे म्हणजे सुसंस्कृत असणे नव्हे. व्यक्ती साक्षर असणे म्हणजे, “ व्यक्तीला लिहीता वाचता येणे होय.” मात्र, कुठले ही लिखाण आणि वाचन करणारी व्यक्ती ही सुसंस्कृत असतेच असे नाही.
सुसंस्कृत म्हणजे, “ व्यक्तीचे इतरांसोबत वागणे, बोलणे, समोरच्या व्यक्तीला समजून घेणे, आपल्या बोलण्या-चालण्यातून समोरच्या व्यक्तीला अडचणीच्या काळात मदत करणे, त्याला आधार देणे, मनाचा मोठेपणा दाखवून मोठ्यांना ही समजून घेणे, सर्वांशी प्रेमाने, मायेने, सर्व काही समजून उमजून वागणे. ” अशा अनेक गोष्टी सुसंस्कृतपणा बद्दल सांगता येतील. अनेक वेळेस साक्षर असणाऱ्या व्यक्तीच्या अंगी सुसंस्कृतपणा दिसून येत नाही. हा सुसंस्कृतपणा साक्षर झाल्याने येतो असे अनेकांना वाटते. याचमुळे अनेकांची सुसंस्कृतपणा आणि साक्षर यात गल्लत होते. आजकाल उंच भरजरी कपडे घालणारे, मध्येचं इंग्रजी बोलणारे, मॉल संस्कृती अंगीकारणारे, वेगवेगळ्या स्टाईल करणारे, तोकडे कपडे घालणारे, एन्जॉयच्या नावाखाली वाटेल ते चाळे करणारे साक्षर आपण सुसंस्कृत समजू लागलो. सर्व सामान्यांना ही हे साक्षर फार सुसंस्कृत आहेत असे वाटू लागले आहे.
परंतू, या अशा साक्षर लोकांमुळे आपल्या संस्कृती आणि सुसंस्कृतपणास ठेस बसली आहे. रस्त्याने डाव्या बाजूने वाहने चालवावी असा नियम असतांना ही साक्षर सुसंस्कृतपणाचे पांघरून घालून फिरणारी बांडगुळे सरास रहदारीचे नियम मोठ्या प्रमाणावर मोडतांना पहावयास रोज मिळतात. कारण गाडी चालवण्याचा परवाना साक्षारांनाच मिळतो. साक्षर असणारी व्यक्ती सुसंस्कृत असतेच असे नाही. उलट एक बघितल्यास साक्षर असणारा व्यक्तीच आपल्याला जास्त विचित्र आणि नियम बाह्य वागतांना दिसतो. एखादी व्यक्ती साक्षर नसेलही, परंतू ती सुसंस्कृत असू शकते. असे निरक्षर परंतु सुसंस्कृत आज काही प्रमाणात दिसून येतात. सुसंस्कृत असणारी व्यक्ती शक्यतो सर्व गोष्टींचे भान ठेवूनच जीवन जगत असते. माझ्या बोलण्या चालण्याचा स्वतःवर, माझ्या कुटुंबावर, घरातील लहान मुलांवर, समाजावर व राष्ट्रावर व आपण जी संस्कृती जगतोय त्या संस्कृतीवर आपल्या सर्व चांगल्या-वाईट गोष्टींचा काय परिणाम होऊ शकतो ? याचा सर्व बाजूने विचार करूनच सुसंस्कृत व्यक्ती जीवन जगत असते.
फक्त साक्षर असणारी व्यक्ती असला कुठलाच विचार न करता आपल्या स्टाईलने कुठेही, केव्हा ही थुंकताना दिसते किंवा ज्या ठिकाणी लिहिलेले असते, “इथे कचरा टाकू नये.” त्याच ठिकाणी कचरा टाकतांना दिसते. अनेक कार्यालयात “ इथे थुंकू नये”, असे लिहिलेले असतांनाही भिंती रंगलेल्या दिसतात. कुठल्या ही कार्यालयात साक्षर व्यक्तींचाच वावर जास्त असतो. त्या ठिकाणी हे कृत्य करणारे साक्षर सुसंस्कृत कसे म्हणावे ? सुसंस्कृतपणा साक्षर झाल्याने येत नसतो. त्यासाठी चांगले संस्कार व चांगले विचार व्यक्तीमध्ये असावे लागतात. भले ही व्यक्ती निरक्षर असो, पण त्याचे संस्कार चांगले असतील तर, तो कुठले ही वाईट काम करण्या अगोदर विचार करतो. त्याच्या वाईट कृत्याने काय घडू शकते, याचा तो विचार करतो आणि मग निर्णय घेतो. याला सुसंस्कृत म्हणावे.
समाजात अनेक वाईट गोष्टी ह्या व्यक्ती सुसंस्कृतपणापासून दूर जात असल्यामुळे घडत आहेत. आजकाल कुणीच- कुणाला समजून घ्यायला तयार नाही. पद, पैसा, प्रतिष्ठा यांच्या मागे व्यक्ती धाव-धाव धावतोय. साक्षरतेचा बुरखा घालून सुसंस्कृतपणाचा लेप लावून समाजात वावरतोय. परंतू समाजातील वातावरण चांगले ठेवायचे असल्यास नुसते साक्षर होऊन जमणार नाही. त्यासाठी सुसंस्कृत होणे फार गरजेचे आहे. सुसंस्कृत असणारा समाज एक वेळ साक्षर नसला तरी चालेल. परंतू साक्षर असणारा समाज सुसंस्कृत असणे गरजेचे आहे. समाजात साक्षर व्यक्ती सुसंस्कृत असेल तर कुटुंब विभक्त होणार नाही, नात्यांमध्ये कटूता दिसणार नाही, संस्कार शिकविण्याची गरज पडणार नाही, सामाजिक नियमांचे पालन सर्व समाजाकडून आपोपाप होईल. यातूनच एक सुंदर संस्कृती असलेले राष्ट्र पुन्हा उदयास येईल.
- सचिन व्ही. काळे, जालना.